ढाका – बांगला देशातील हरकत उल जिहाद अल इस्लामि यासंघटनेच्या दहा जणांना सन 2001 मध्ये कम्युनिस्ट पार्टीच्या रॅलीत बॉम्बस्फोट घडवून आणल्याच्या आरोपाखाली फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. त्याखेरीज प्रत्येकाला 20 हजार टका इतका दंडही ठोठावण्यात आला आहे. या प्रकरणातील अन्य दोन जणांची ढाक्याच्या महानगर सत्र न्यायालयाने निर्दोष सुटका केली आहे. ढाक्याच्या पलटन मैदानावरील सभेच्यावेळी घडवण्यात आलेल्या या बॉम्बस्फोटात आठ जण ठार झाले तर 50 जण जखमी झाले होते.
या प्रकरणातील मुख्य आरोपी मुफ्ती अब्दुल हन्नान याला ब्रिटीश राजदूत अन्वर चौधरी यांच्यावर हल्ला केल्याच्या प्रकरणात या आधीच फासावर लटकवण्यात आले आहे. तोच या हरकत अल जिहाद अल इस्लामि या बंदी घालण्यात आलेल्या संघटनेचा प्रमुख म्हणून काम करीत होता.
या बॉम्बस्फोट प्रकरणात एकूण तेरा आरोपी होते. त्यातील चार जण आजच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित होते तर अन्य सहा आरोपी फरारी आहेत. दोन जण निर्दोष सुटले आहेत. हा बॉम्बस्फोट म्हणजे लोकशाहीचीच हत्या करण्याचा प्रकार असून धर्माच्या नावाखाली असा अमानुष प्रकार करण्याचा कोणालाही अधिकार नाही अशी टिपण्णी कोर्टाने आपल्या निकालपत्रात केली आहे.