नवी दिल्ली – मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी निघाले होते. पण या रॅलीला मिळालेला मोठा प्रतिसाद आणि ठिकठिकाणी झालेल्या स्वागतामुळे त्यांना संबंधीत कार्यालयात पोचण्यास उशिर झाल्याने त्यांना आज उमेदवारी अर्ज दाखल करता आला नाहीं. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी संबंधीत कार्यालयात दुपारी तीन वाजेपर्यंतच येणे अपेक्षित होते पण केजरीवाल हे त्यावेळेपर्यंत तेथे पोचू शकले नाहीत त्यामुळे त्यांना आज आपला उमेदवारी अर्ज भरता आला नाही.
लोकांचा आग्रह आपल्याला मोडवला नाही त्यामुळे आपल्याला निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहचण्यास विलंब झाल्याने आपण आता उद्या उमेदवारी अर्ज दाखल करू असे केजरीवालांनी पत्रकारांना सांगितले. आज त्यांच्या रॅलीला मोठीच गर्दी झाली होती. यावेळी त्यांच्या समवेत त्यांचे कुटुंबियही सहभागी झाले होते. आम आदमी पक्षाने यंदा 70 जागांसाठी सर्वात आधी उमेदवार जाहीर केले असून यात त्यांनी 46 विद्यमान आमदारांना उमेदवारी दिली आहे. 24 नवीन चेहरे त्यांनी दिले आहेत.