लोणी काळभोर -हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये मंगळवारी (दि. 23) दिवसभरात नव्याने 10 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून मागील तीन दिवसांत आढळून आलेल्या करोनाबाधित रुग्णांची संख्या 22वर पोचली आहे.
मागील तीन दिवसांत पूर्व हवेलीत तब्बल 22 रुग्ण आढळून आल्याने आले असले तरी, नागरीक गर्दीच्या ठिकाणी सोशल डिस्टन्स पाळणे अथवा घऱाबाहेर पडताना मास्कचा वापर करणे या आरोग्य विभागाच्या सूचना अजिबात पाळत नाहीत. मागील तीन दिवसांतील करोना बाधितांची संख्या पाहता, पूर्व हवेलीतील नागरिकांनी खडबडून जागे होण्याची वेळ आली आहे.
थेऊर, उरुळी कांचन, लोणी काळभोर, कोरेगाव मुळ व कुंजीरवाडी या पाच गावांत सोमवारी दिवसभरात तब्बल बारा करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. आरोग्य विभागाने वरील बारा रुग्णांच्या संपर्कात आलेल्या 57 जणांचे स्वॅब (घशातील द्रव) तपासणीसाठी पुण्यातील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले होते.
यामधील एका सहा वर्षीय मुलीसह आठ जण करोना पॉझिटीव्ह असल्याचे आढळून आले. तर मंगळवारी दिवसभरात उरुळी कांचन व वळती ग्रामपंचायत हद्दीत प्रत्येकी एक असे दोन रुग्ण आढळून आले.
लोणी काळभोर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय आधिकारी डॉ. डी. जे. जाधव म्हणाले, थेऊर, लोणी काळभोरसह पूर्व हवेलीत सोमवारी आढळून आलेल्या 12 करोना बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले आणखी आठ रुग्ण मंगळवारी करोना बाधित असल्याचे आढळून आले आहे. यात कुंजीरवाडी हद्दीतील रुग्णांच्या घरातील तीन जण आहेत.
तर लोणी काळभोर हद्दीतील रुग्णाच्या संपर्कात आलेले नातेवाईक व मित्राचाही समावेश आहे. तर दुसरीकडे मंगळवारी दिवसभरात वळती व उरुळी कांचन हद्दीत मिळून दोन नव्याने करोनाचे रुग्ण आढळून आल्याची माहिती उरुळी कांचनच्या आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता कदम यांनी दिली.
विनामास्क फिरणाऱ्या 10 जणांवर गुन्हा
हवेली तालुक्याच्या पूर्व भागातील गावांमध्ये करोनाबाधितांची ची संख्या वाढू लागल्यामुळे लोणी काळभोर पोलिसांनी विनामास्क फिरणाऱ्या 10 नागरिकांच्या विरोधात बुधवारी (दि. 24) गुन्हे दाखल केले आहेत. वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरज बंडगर म्हणाले की, यापुढील काळात विनामास्क व कारण नसताना फिरणाऱ्या नागरिकांच्या विरोधात कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
त्यामुळे नागरिकांनी विनामास्क व कारण नसताना फिरु नये. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दुकानदारांनी संध्याकाळी 7 वाजण्याच्या आत आपापली दुकाने बंद करावीत, अन्यथा आगामी काळात त्यांच्या विरोधात ही कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारत त्यांनी दिला आहे.