बिबवेवाडी (हर्षद कटारिया) – महापालिकेत प्रशासन कारभार पाहात आहे. कारभार आयुक्त पाहात आहेत. नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतरही अनेक माजी नगरसेवकांच्या वाहनांवर “पुणे महानगरपालिका सभासद’ स्टिकर तशीच कायम आहेत. पदाची मुदत संपल्यानंतर शासकीय वाहने पालिकेकडे जमा करण्यात आली. परंतु, स्वत:च्या वाहनांवर मात्र “पुणे महानगरपालिका सभासद’ पदाचे स्टिकर अद्यापही तशीच कायम आहेत. हे नियमबाह्य असून आयुक्तांनी याबाबत सूचना करणे गरजेचे असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.
“पुणे महानगरपालिका सभासद’ (नगरसेवक) म्हणून मिरविण्यापेक्षा नागरिकांच्या अडचणी सोडविण्यासाठी कामात सातत्य ठेवले तर नागरिकांच्या मनात नगरसेवक म्हणून जागा कायम राहील, ही बाब समजविण्यात संबंधित नगरसेवकांसह त्या-त्या पक्षाचे प्रमुखही कमी पडत आहेत. नगरसेवक पदाची मुदर संपल्यानंतर वाहनांवरील “पुणे महानगरपालिका सभासद’चे स्टिकर काढणे गरजेचे आहे. मात्र, संबंधित खात्यातील वरिष्ठ अधिकारीही याकडे दुर्लक्ष करीत आहेत.
अ ब क ड यांच्या निवासस्थानाकडे…
अनेक नगरसेवक तसेच माजी नगरसेवकांनीही आपल्या प्रभागातील रस्त्यांवर स्वत:च्या निवासस्थानाकडे जाणाऱ्या रस्त्यांवर दिशादर्शक फलक लावले आहेत. अनेक प्रभागात “मा. नगरसेवक’ तर करीत कधी “नगरसेवक अ ब क ड यांच्या निवासस्थानाकडे’ असा उल्लेख या फलकांवर आढळतो, अशा फलकांची प्रभागात खरोखच गरज आहे का? प्रभागातील नागरिकांना त्या-त्या नगरसेवकाचे निवासस्थान माहित नसते का? हा अनावश्यक खर्च कशासाठी? असे फलकही काढण्यात यावेत, अशी नागरिकांची मागणी आहे.
खासगी वाहनांवर “पुणे महानगरपालिका सभासद’ स्टिकर तशीच
मी महापौर पद गेले त्याच दिवशीच माझ्या वाहनावरील महानगरपालिकेचे स्टिकर काढले आहे, अशा गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. महानगरपालिका सभासद म्हणून असलेल्या स्टिकरचा गैरवापर नातेवाईक अथवा कार्यकर्ते यांच्या कडून होऊ नये.
– मुरलीधर मोहोळ, माजी महापौर, भाजप
नगरसेवक पदाची मुदत संपल्यानंतरही वाहनावर “पालिका सभासद’, असे स्टिकर वाहन लावून वावरणे गुन्हा आहे. माजी नगरसेवक नावाच्या सुरवातीला फक्त “मा.’ लिहितात तेही चूक आहे. मुळातच लोकप्रतिनिधीची ओळख त्याच्या नावाने नाही तर कामाने व्हावी.
– विजय कुंभार,
राज्य संघटक, आम आदमी पार्टी
माजी नगरसेवकांने वाहनावरील स्टिकर काढण्या संदर्भात सर्व पक्षीय निर्णय होणे गरजेचे आहे. याबाबत निर्णय झाल्यास पक्षाचे सर्व माजी नगरसेवक निर्णयाचे पालन करतील. महानगरपालिकेच्या स्टिकरची कुबडी वापरणे म्हणजे त्यांच्या राजकीय कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह आहे.
– प्रशांत जगताप,
शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष