सिंहगडरस्ता – सिंहगड रस्त्यावर नांदेड, किरकिटवाडी, खडकवासला भागात जाण्यासाठीच्या रस्त्यावर वाहतुकीचा ताण येत असल्याने पर्याय म्हणून महापालिकेच्यावतीने प्रयेजा सिटी ते नांदेड सिटी हा 30 मीटरचा डीपी रस्ता विकसित करण्यात येत आहे. एकूण 1.5 कि.मी.चा रस्ता असून त्यापैकी 460 मी. रस्त्याचे काम सुरू आहे. काही भागात डांबरीकरण झाले असून डीपी मंजुरी 30 मीटर रस्ता असताना सध्या काम मात्र 12 मीटरचेच करण्यात आले आहे.
निधीअभावी हा रस्ता 12 मीटरचा केला जात असला तरी नियोजन करताना 30 मीटरच्या अनुषंगाने करावे, म्हणजे भविष्यात त्रास होणार नाही, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
रस्त्याचे काम लवकरच मार्गी लागेल. शेतकऱ्यांना जागेच्या मोबदल्याबाबतचा निर्णय प्रशासकीय पातळीवर झालेला नाही. सध्या महापालिकेकडे मोबदला देण्यासाठी निधी नाही त्यामुळे टीडीआर किंवा एफएसआयचा पर्याय आम्ही त्यांना देऊ शकतो.
– अमर शिंदे, कार्यकारी अभियंता, पथक विभाग, मनपा
महापालिकेने नियमानुसार काम करावे. रस्त्याची उंची पालिकेने जमिनीपासून सहा फूट उंच घेतल्याने पावसाचे पाणी येथे साचले असते आणि रस्ता खचला असता, असे अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी रस्त्याची उंची कमी केली. – चंद्रशेखर पोकळे पाटील,
शेतकरी/सिव्हिल इंजिनिअर
विकासकामे नियमाच्या चौकटीमध्ये राहुन करा. शेतकऱ्यांना त्यांचा जागेचा मोबदला अगोदर दिला पाहिजे. मगच जमीन संपादन केलेपाहिजे, जागेची संयुक्त मोजणी केली पाहिजे. पुरेसा निधी आला की एकाच टप्प्यामध्ये काम पूर्ण झाले पाहिजे असे नियोजन करावे. – महेश पोकळे,
शिवसेना विभाग प्रमुख