कॉंक्रीट रस्त्यांमुळे वाढतेय तापमान

श्रीनिवास वारुंजीकर/ डॉ. मेघश्री दळवी

पुणे – आधुनिक शहरीकरणाच्या नावाखाली पुण्यात विकसित करण्यात आलेले कॉंक्रीटचे रस्ते पर्यावरण-स्नेही अजिबात नाहीतच, शिवाय वातावरणामधली उष्णता वाढवण्यात या रस्त्यांचा मोठा हिस्सा आहे. डांबराचे रस्ते उन्हामुळे तापले की ते उष्णता खाली जमिनीकडे पाठवतात. मात्र कॉंक्रीटचे रस्ते ही उष्णता उलट फेकतात आणि तापमान वाढण्यास सुरुवात होते. अशातच वाहनांच्या रबरी टायर्सच्या घर्षणानेही नवी उष्णता निर्माण होते. त्यामुळे सिमेंटच्या पृष्ठभागाकडून परावर्तीत होणारी उष्णता, तापलेल्या टायरची उष्णता, वाहनांतून बाहेर पडणाऱ्या धुरामुळे वाढणारी उष्णता आणि कारच्या एअर कंडिशनरमधून बाहेर पडणारी उष्णता यामुळे कॉंक्रीटचे सर्वच रस्ते उष्णतेचे प्रचंड मोठे वाहक बनतात.

शहरं वाढतात, अस्ताव्यस्त पसरत जातात. ज्या वेगाने झोपड्या वाढतात, त्याहून अधिक वेगाने कॉंक्रीटच्या उंच इमारती वाढताना दिसतात. नैसर्गिक जंगलं नष्ट होत जातात आणि कॉंक्रीटची जंगलं उभी रहातात. गेल्या काही वर्षांमध्ये पुण्यासह अनेक शहरांत झपाट्याने रस्त्यांचं कॉंक्रीटीकरण होत आहे. हे रस्ते जास्त टिकतात हे जरी खरं असलं, तरी त्याचे दुष्परिणाम नजरेआड करता येणार नाहीत. विशेषत: परिसरात होणाऱ्या तापमानवाढीच्या दृष्टीने. जगाचं सरासरी तापमान सध्या वाढतं आहे. त्यामुळे पूर, दुष्काळ, अति बर्फवृष्टी असे टोकाचे अनुभव आपल्या सर्वांना येत आहेत.

कॉंक्रीटमुळे या ग्लोबल वॉर्मिंगमध्ये आणखी भर पडते आहे का?
एकूणच उष्ण प्रदेशातल्या शहरांमध्ये कॉंक्रीटच्या इमारती आणि कॉंक्रीटच्या रस्त्यांमुळे हीट आयलंड इफेक्‍ट’ दिसून येतो. आजूबाजूच्या हिरवाईच्या किंवा निमशहरी भागाच्या तुलनेत शहरी भागात दिवसा सुमारे 1 ते तीन 3 सेल्शियस जास्त तापमान आढळतं. एक प्रकारे हे उष्म्याचे बेट तयार होत असतं. सूर्यास्तानंतर थेट मिळणारी उष्णता घटली की हिरवाई लागलीच थंड होते. दगडी किंवा मातीचे बांधकाम असेल, तर तेही लवकर गार होते.

शहर आणि भोवतालचा हिरवाईचा परिसर यात रात्रीच्या वेळी तापमानातला फरक 6 ते 12 अंश सेल्शियस इतका असू शकतो. एवढ्याश्‍या पावसात पाणी गुडघ्यापर्यंत कसं येतं याचा आपण अचंबा करत राहतो. पण त्यामागे असतं हे सत्य. या हीट आयलंड परिणामा’चा पुढचा भाग म्हणजे या परिसरात हवामान बेभरवशाचं होऊ लागतं. अवकाळी पाऊस, उष्म्याचा अतिरेक, हिवाळ्यात कमालीचा गारठा यांना तोंड देता देता शहरी माणूस थकून जातो. या तापमानवाढीची आणखीही एक बाजू आहे. एअर कंडिशनिंगचा म्हणजे एसीचा वापर पूर्वी कमी प्रमाणात व्हायचा. पण आता अनेक ठिकाणी एसी अत्यावश्‍यक बनू लागलं आहे. ही एसी यंत्रणा घर किंवा ऑफिस थंड ठेवताना बाहेर उष्ण झोत टाकते. त्यामुळे रस्त्यांवर हवेत अधिक उष्मा जाणवतो. म्हणजे एकदा तापमान वाढायला लागलं की चक्रवाढीने ते वाढत जातं आणि त्याचे परिणाम अनेकपटींनी अनेक दिशांनी जाणवायला लागतात. शहरात हिरवाई वाढवणं आणि कॉन्क्रीटचे प्रमाण कमी करत त्याला दुसरे पर्याय शोधणं या उपायांनी ही तापमानवाढीची तीव्रता कमी करता येईल, असं बांधकाम क्षेत्रातल्या तज्ञांचं मत आहे.

उष्म्याच्या बेटाचे परिणाम…
कॉंक्रीटच्या इमारतीत राहणाऱ्या माणसांना घामाघूम करते. अतिउंच आरसीसी इमारतींमुळे मोकळी हवा खेळती रहात नाही. वायूविजन न झाल्यानं उकाडा आणखी जाणवत राहतो. सूर्यास्तानंतर कॉंक्रीट वेगाने उष्णता बाहेर फेकू शकत (रॅडिएशन) नाही. रात्रीच्या वेळात त्यामुळेच शहरी भागात तापमान फारसं उतरतच नाही. कॉंक्रीटच्या गगनचुंबी इमारतींचा पाया तितक्‍याच प्रमाणात खोल असतो. गगनचुंबी इमारतींमुळे शहरातल्या जमिनीच्या खालचा भागदेखील कॉंक्रीटमय. रस्ते, फूटपाथ कॉंक्रीटचे असल्याने पावसाचं पाणी खोलवर झिरपत नाही. पावसाचं पाणी अशा पृष्ठभागावर साचत जातं आणि मग दिसतं तुंबलेले पुणे.

सप्टेंबर 25 आणि नंतर 9 ऑक्‍टोबर या दोन दिवशी पुण्यात परतीच्या मोसमी पावसाने घातलेला धुमाकूळ अंगावर काटा आणणारा आहे. अनेकांची जीवितहानी, मालमत्तेची हानी आणि सार्वजनिक सोयी-सुविधांचा उडालेला बोजवारा यामुळे पुणे शहर आपत्तींचे शहर बनले आहे. पूरस्थितीनंतर मदत आणि पुनर्वसन कार्य सुरू झाले; पण या समस्येच्या मुळाशी कोणते घटक आहेत आणि त्यावर काय उपाय केले पाहिजेत, याविषयी सखोल आढावा घेणारी मालिका सादर करत आहोत…

Leave A Reply

Your email address will not be published.