कचऱ्यामुळे आरोग्य समस्या गंभीर

– संजोग काळदंते

महामार्गालगत टाकण्यात आलेल्या दुर्गंधीयुक्त कचऱ्यामुळे येथील प्रवासी व स्थानिक नागरिक हैराण झाले असून, या कचऱ्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे.

पुणे-नाशिक आणि नगर-कल्याण या दोन महामार्गांवर टाकला जाणारा हॉटेल व्यावसायिकांचा कचरा, भाजीपाल्याचा कचरा, तसेच मांस विक्री दुकानांचा दैनंदिन कचरा गावोगावी महामार्गालगत टाकला जातो आहे. विशेष म्हणजे यांना कोणाचेही भय नाही. अगदी दारूच्या बाटल्या देखील अनेक ठिकाणी फेकल्या जात आहेत, यामुळे परिसरातील रहिवासी देखील हैराण झाले आहेत. तालुक्‍यात प्रमुख गावांतील बसस्थानक आणि परिसर तर अक्षरशः कचरा टाकण्याची ठिकाणे आहेत का, असा प्रश्‍न पडतो आहे.

अनेक बसस्थानकात दररोज हजारो प्रवाशी ये-जा करीत असतात. काही बसस्थानकांच्या आवारातच भाजीपाल्यासह इतर कचरा पाहायला मिळतो. व्यावसायिक, भाजी बाजारातील व्यापारी व शेतकरी रस्त्यालगतच मोठ्या प्रमाणात कचरा टाकतात. हा कचरा उचलला जात नसल्यामुळे तिथेच कुजतो. त्यामुळे प्रवाशांसह नागरिकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागते. महामार्गावर कोंबड्यांची वाहतूक करणारी वाहने रस्त्यालगतच थांबून कचरा टाकतात. यामुळेही मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरून रोगराईला आमंत्रण दिले जाते आहे. नुकत्याच झालेल्या पावसामुळे कचरा ओला होऊन बऱ्याच प्रमाणात कुजला आहे आणि आता त्याची दुर्गंधी सुटत आहे. या भागातील स्थानिक व्यापारी, नागरिक व प्रवासी त्रस्त झाले आहेत. या कचऱ्यामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात डासांचा उपद्रव वाढत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.