पुणे – मागील चार दिवसांपासून १४ ते १५ अंशाच्या पुढे गेलेले किमान तापमान बुधवारी पुन्हा १२ अंशाच्या खाली गेले. त्यामुळे थंडीचा जोर वाढलेला होता. दिवसभर हवेत गारवा असल्यामुळे चांगलीच थंडी जाणवत होती. पुढील दोन दिवस थंडीचा जोर कायम असेल.
राज्यातील विदर्भात कडाक्याची थंडी असून, यवतमाळमध्ये सर्वात कमी ८.७ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली.
दरम्यान, पुणे शहरात मागील चार दिवसांपासून किमान तापमान वाढलेले असले तरी थंडी चांगली जाणवत होती. मात्र, आज किमान तापमानात दोन ते तीन अंशाने घट झाल्यामुळे थंडीचा कडाका जाणवत होता. पुढील दोन दिवसा किमान तापमानात आणखीन घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तविल्यामुळे थंडीचा कडाका वाढेल. तर २२ डिसेंबरनंतर हवेच्या दिशेत बदल होण्याची शक्यता असल्यामुळे पुन्हा किमान तापमानात दोन अंशाने वाढ होऊ शकते. आकाश निरभ्र तर अधून-मधून ढगाळ वातावरण राहील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.