पिंपरी – दोन बीएचके घर घेण्यासाठी एक लाख रुपये देऊन बुक केलेले घर काही कारणास्तव रद्द करावे लागल्याने बांधकाम व्यावसायिक संबंधित कुटुंबाला पैसे परत देण्यास नकार देत होता. मात्र, मनसेचे पिंपरी-चिंचवड शहर सचिव रुपेश पटेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मध्यस्थी करताच कुटुंबाला पैसे परत मिळाले. यामुळे कुटुंबातील सद्स्या मनिषा सुराशे यांनी अध्यक्ष राज ठाकरे आणि पटेकर यांचे आभार मानले आहेत.
सुरवसे कुटुंबीयांनी तळेगाव दाभाडे येथे एका बांधकाम प्रकल्पात दोन बीएचके सदनिका घेण्यासाठी एक लाख रुपये देऊन घर बुक केले होते. मात्र, काही कारणास्तव सुराशे कुटुंबीयांना सदनिका घेण्याचा निर्णय रद्द करावा लागला. त्यांनी बुकिंग रक्कम परत देण्याची बांधकाम व्यावसायिकाकडे मागणी केली. परंतु, बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयातून बुकिंग रक्कम परत देण्यास नकार देण्यात आला. वारंवार पाठपुरावा करुनही रक्कम मिळत नसल्याने सुराशे कुटुंबीयांनी मनसेचे सचिव रुपेश पटेकर यांच्याशी संपर्क साधला.
पटेकर आणि त्यांच्या सहका-यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिकाच्या कार्यालयात जाऊन त्यांच्याशी चर्चा केली. सुराशे कुटुंबीयांना बुकींग रक्कम परत मिळालीच पाहिजे, यावर मनसे ठाम राहिल्याने बांधकाम व्यावसायिकाने त्वरीत कुटुंबीयांना पैसे परत केले.
मनसे पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे सामान्य कुटुंबाला न्याय मिळाला. यामुळे सुराशे कुटुंबातील सदस्या मनिषा यांनी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे, रुपेश पटेकर आणि मनसे कार्यकर्त्यांचे आभार मानले आहेत.