बारामती -व्हिडिओ शूटिंगचा वाद विकोपाला जाऊन पोलीस आणि वकील यांच्यात हाणामारी झाल्याची घटना बारामती न्यायालयाच्या आवारात घडली. कायद्याचे रखवालदार व कायदेपंडित यांच्यात घडलेल्या या प्रकाराची शहरात दिवसभर चर्चा राहिली. अखेर वरिष्ठ अधिकारी व नेतेमंडळींच्या मध्यस्थीने पोलीस आणि वकील यांच्यातील वादावर पडदा पडला.
सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी भाजपचे नेते प्रशांत सातव यांच्यासह अन्य काही कार्यकर्त्यांवर गुरुवारी (दि. 14) गुन्हा दाखल करण्यात आला होता. न्यायालयीन कामकाजासाठी आज (दि. 15) त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले होते. यावेळी न्यायालयाच्या आवारात व्हिडिओ शूटिंग करत असलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यास वकिलांनी मज्जाव केला. बेकायदा शूटिंग करू नये, असे पोलीस कर्मचाऱ्याला सांगण्यात आले. या कारणावरून पोलीस आणि वकील यांच्यात जुंपली.
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर हे न्यायालयात हजर झाले. यावेळी ऍड. राजेंद्र काळे, नितीन भामे व इतर वकिलांनी ही बाब शिरगावकर यांच्या निदर्शनास आणली. मात्र चर्चेची पातळी घसरल्याने शाब्दिक चकमक तसेच शिवीगाळही झाली. वाद विकोपाला गेला त्याचे पर्यावसन हाणामारीत झाले.
वकिलांना नोटीस
उपविभागीय पोलीस अधिकारी नारायण शिरगावकर यांच्यासह इतर पोलिसांवरही कारवाईची जोरदार मागणी वकिलांनी केली. अखेर वरिष्ठ नेतेमंडळींच्या मध्यस्थीने वकील आणि पोलिसांच्यात समेट घडली. कलम 67 प्रमाणे पोलिसांनी वकिलांना नोटीस बजावली.