मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात मशिदींवरील भोंगे आणि हनुमान चालीसा लावण्यावरून राजकारण सुरु झाले आहे. त्यातच अमरावतीमधील आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करण्याची भूमिका घेतल्याने नवा वाद सुरु झाला आहे. या मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी खोचक शब्दांत राणा दाम्पत्यावर टीका केली आहे.
इस्लामपूरमध्ये आयोजित एका कार्यक्रमानंतर रवी राणा आणि नवनीत राणा यांच्या भूमिकेवर विचारणा केली असता त्यावर सुप्रिया सुळेंनी “माझी सगळ्या गोष्टींवर श्रद्धा आहे, पण अंधश्रद्धा नाही”, अशी प्रतिक्रिया दिली. तसेच सुप्रिय सुळे म्हणाल्या. “तुम्हाला खरं सांगू? माझ्या मतदारसंघात मला इतकी कामं असतात, की मला बाकीचे खासदार काय करतात याचा फारसा अभ्यास नसतो. लोकसभा मतदारसंघ, त्याचा व्याप फार मोठा असतो”, असे त्या म्हणाल्या.
दिल्लीतील नवनीत राणांच्या कार्यपद्धतीविषयी बोलताना त्या म्हणाल्या, “नवनीत राणा दिल्लीत खूप अॅक्टिव्ह आहेत. खूप वेळा भाषण करतात. माझ्या दिल्लीतल्या सहकारी आहेत”.
आज मातोश्रीबाहेर हनुमान चालीसा पठण करणार असल्याची घोषणा राणा दाम्पत्याने केली होती. या घोषणेपासूनच शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यामुळे साकाळीच राणा यांच्या खार येथील निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी आंदोलन सुरू केले होते. तसेच, तिथले बॅरिकेड्स तोडून शिवसेना कार्यकर्ते इमारतीमध्ये घुसल्याचे देखील समोर आले होते.