हैदराबाद : कोरोनाची बाधा झालेला दुसरा रुग्ण तेलंगणात आढळला आहे. त्याच्या प्राथमिक चाचणीत त्याला बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र पुण्यातील एनआयव्हीकडून त्याचा अहवाल आला नाही. ही व्यक्ती इटलीला जाऊन आलेली होती. इटलीला जाऊन आलेल्या अन्य दोन जणांमध्ये लक्षणे आढळली आहेत. त्यांना विलगता कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्या नमुन्यांचे अहवाल अद्याप यायचे आहेत, असे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी शनिवारी सांगितले.
हैदराबादमधील एका माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील कर्मचाऱ्याला कोरोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले होते. त्याने 14 दिवस उपचार घेतल्यानंतर तो पूर्णपणे बरा झाला असल्याचे तेलंगणाच्या आरोग्य मंत्र्यांनी शुक्रवारी जाहीर केले होते. मुख्यमंत्री राव यांनी दुसरा रुग्ण सापडताच वरीष्ठ अधिकाऱ्यांची तातडीने बैठक घेतली. त्यानंतर तेलंगणामधील सर्व शाळा, महाविद्यालये, मॉल, पब 31 मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले.
महाराष्ट्र, दिल्ली, छत्तीसगढ, हिमाचल प्रदेश, कर्नाटक आणि उत्तर प्रदेशसह अनेक राज्यांनी शाळा आणि माहविद्यालयांना सुटी दिलीआहे. प. बंगालमध्येही शाळा महाविद्यालयांना 31 मार्च पर्यंत सुटी जाहीर केली आहेत.