Tejaswini Pandit: अभिनेत्री तेजस्विनी पंडित लवकरच एका ऐतिहासिक भूमिकेत पाहायला मिळणार आहे. राजमाता जिजाबाई शहाजीराजे भोसले यांच्या आयुष्यावर आधारित चित्रपटात तेजस्विनी मुख्यभूमिकेत पाहायला मिळणार आहे. स्त्रीशक्ती आणि मातृशक्तीचं चिरंतन उदाहरण म्हणून राजमाता जिजाऊंकडे पाहिलं जातं. जगाला दिशा देणाऱ्या जिजाऊंच्या आयुष्यावर आधारित ‘स्वराज्य कनिका जिजाऊ’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रपटात जिजाऊंची भूमिका अभिनेत्री तेजस्विनी पंडित साकारणार आहे. या चित्रपटाचं पोस्टर सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं असून त्यात राजमाता जिजाऊ यांची करारी मुद्रा दिसत आहे. 6 फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स निर्मित या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन अनुजा देशपांडे या करत आहेत.
View this post on Instagram
दिग्दर्शिका अनुजा देशपांडे म्हणाल्या, “राजा नंतर घडतो, आधी घडते ती राजमाता. राजमाता जिजाऊसाहेब या लोकजीवनाला जोडणारी अस्मिता तर आहेतच. पण त्याचबरोबर मराठी माणसाला त्याच्या अस्तित्वाची-सामर्थ्याची जाणीव करून देणारी एक शक्ती आहेत. हा अभिमान आणि जाणीव उराशी बाळगून वीरकन्या ते वीरमातेच्या जीवनकाळचे कथानक दोन ते अडीच तासात मांडणं एक लेखिका म्हणून माझ्यासाठी आव्हानात्मक होतं. जिजाऊसाहेबांच्या आयुष्यावरील वेगळ्या धाटणीचा हा चित्रपट आहे.”
“जिजाऊसाहेबांची असामान्य भूमिका साकारण्यासाठी उत्तम व्यक्तिमत्व, उत्तम अभिनय असणारी अभिनेत्री मला हवी होती. तेजस्वीनी एक दर्जेदार अभिनेत्री तर आहेच. शिवाय एक व्यक्ति म्हणून ती प्रेमळ आहे. त्याचसोबत एक उत्तम मार्गदर्शक आणि सहाय्यक आहे. जिजाऊंचा करारीपणा तिच्यात झळकतो. ती जिजाऊसाहेबांची भूमिका अगदी चोखपणे साकारेल”, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच तेजस्विनी पंडितने देखील जिजाऊंची भूमिका साकारण्याची संधी दिल्याने अनुजा देशपांडे यांचे आभार मानले आणि आनंद व्यक्त केला.