पश्चिम बंगालमध्ये छापेमारीदरम्यान ईडी अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर पुन्हा एकदा ईडीने कारवाई केली आहे. न्यायालयाकडून संरक्षण मिळाल्यानंतर ईडीची टीम पुन्हा एकदा छापेमारीसाठी दाखल झाली आहे. पश्चिम बंगालचे अग्निशमन सेवा मंत्री सुजित बोस यांच्या घरावर ईडीने छापा टाकला आहे. महापालिका संस्थांमधील भरती घोटाळ्याप्रकरणी ईडीने कोलकातासह अनेक ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, सुजित बोस व्यतिरिक्त, ईडी टीएमसीचे प्रवक्ते आणि आमदार तपस रॉय आणि उत्तर दमदम नगरपालिकेचे माजी अध्यक्ष सुबोध चक्रवर्ती यांच्यासह वरिष्ठ टीएमसी नेत्यांच्या घरांची झडती घेत आहे. ईडीच्या अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर केंद्र आणि राज्य सरकार एकमेकांवर हल्लाबोल करत असताना ईडीची ही छापेमारी होत आहे.
ईडीचे कार्यकारी संचालक राहुल नवीन यांनी अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत सांगितले की, तपासादरम्यान अधिकाऱ्यांनी घाबरण्याची गरज नाही. तुम्ही धैर्याने तपास करा. तपासात एनआयएची मदत घेण्यासही ईडीने अधिकाऱ्यांना सांगितले आहे. शाहजहान शेखच्या बांगलादेश कनेक्शनवर ईडीची नजर आहे. महिला पोलिसांनाही अधिकाऱ्यांसोबत येण्यास सांगण्यात आले आहे. जेणेकरून महिलांनी तपासात काही अडथळे आणल्यास त्यांना तसे करण्यापासून रोखता येईल.