“तेजस’ला हक्‍काचे “घर’

18 स्क्वाड्रन या तुकडीत “एलसीए तेजस’चा समावेश

– गायत्री वाजपेयी

पुणे – “एलसीए तेजस’ या स्वदेशी बनावटीच्या कमी वजनाच्या लढाऊ विमानाला लवकरच हक्‍काचे घर मिळणार असून, “फ्लाइंग बुलेट्‌स’ असे त्याचे नाव असणार आहे. हवाईदलातर्फे कोईंबतूरजवळील सुलूर येथे पुनर्कार्यान्वित केल्या जाणाऱ्या 18 स्क्वाड्रन या तुकडीत “एलसीए तेजस’चा समावेश असणार आहे.

बुधवारी (दि.27) कोईंबतूरजवळील सुलूर येथे हवाईदल प्रमुख एअर चीफ मार्शल आर. के. एस. भदुरिया यांच्या प्रमुख उपस्थितीत या तुकडीचा औपचारिक प्रवेश होणार आहे. पहिल्या टप्प्यात 40 तेजस लढाऊ विमाने या तुकडीत समाविष्ट होणार असून, त्या विमानांच्या जुळवणीचे काम अंतिम टप्प्यात आहे.

हवाईदलात यापूर्वीही 18 स्क्वाड्रन ही तुकडी कार्यरत होती. या तुकडीची स्थापना 1965 साली झाली होती. 2016 साली या तुकडीला रद्द करण्यात आले, यावेळी 18 स्क्वाड्रन ही “मिग 27′ या लढाऊ विमानांची तुकडी होती.

निर्मितीच्या पहिल्या टप्प्यात मोठ्या प्रमाणात टीकेचे धनी झालेल्या “एलसीए तेजस’ या विमानाने त्यानंतर भरारी घेत, सातत्याने नवीन विक्रम प्रस्थापित केले आहे. स्वदेशी बनावटीच्या या विमानाची निर्मिती आणि त्याचे यश हे हवाई दलासाठी महत्त्वाची बाब आहे.

रशियन वैमानिकासह पुण्यातून तेजसचे उड्डाण
भारत आणि रशिया यांच्यामध्ये डिसेंबर 2019 मध्ये झालेल्या “इंद्र’ संयुक्‍त सैन्य सरावात दोन्ही देशाच्या लष्कर, नौदल आणि हवाई दल या तिन्ही दलांनी एकत्रित सहभाग घेतला होता. या सरावाचा भाग म्हणून पुण्यातील लोहगाव येथील हवाई दलाच्या विमानतळावरून तेजस विमानाने उड्डाण केले होते. विशेष म्हणजे यावेळी विमानात भारतीय हवाई दलाच्या वैमानिकासह रशियन हवाई दलाचा वैमानिक लेफ्टनंट कर्नल नेस्ते ऍन्ड्रे हे देखील होते.

“तेजस विमानातील एक विलक्षण अनुभव असून, मला तेजस आणि सुखोई यामध्ये डॉग फाइट करायची इच्छा आहे’
– लेफ्टनंट कर्नल ऍन्ड्रे, वैमानिक, रशियन हवाई दल

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.