बॉलीवूडचा ज्युनिअर बी अभिषेक बच्चन याची आगामी वेब सीरिज “ब्रिद ः इन टू द शॅडोज’चा टीझर रिलीज झाला आहे. त्यामुळे आता अभिषेक डिजिटल डेब्यूसाठी तयार आहे. या वेब सीरिजमध्ये अभिषेकसोबत अमित साध प्रमुख भूमिकेत झळकणार आहे. या वेब सीरिजला मयंक शर्मा यांनी दिग्दर्शित केले आहे. तर भवानी अय्यर, अरशद सय्यद, मयंक शर्मा आणि विक्रम टुली या प्रसिद्ध पटकथा लेखकांनी ही वेब सीरिज लिहिली आहे.
टीझरच्या बॅकग्राउंडला अभिषेकचा आवाज ऐकायला मिळतो. अभिषेक यात म्हणतो, “मी नेहमी सियाला सांगत होतो की, सूर्य प्रकाशाकडे बघ, तेव्हा तुझी सावली नेहमी तुझ्या पाठीमागे असेल. मला काय माहीत, एक वेळ अशी येते की, तीच सावली तिचा पाठलाग करते, तिला चोहोबाजूने घेराव घालते आणि मग तिला अंधारात घेऊन जाते’.
अभिषेकने वेब सीरिजच्या टीझरला त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून शेअर केले आहे. या वेब सीरिजमध्ये अमित साध याने पोलीस इन्स्पेक्टर कबीर सावंत हे पात्र साकारले आहे. ही वेब सीरिज 2018 मध्ये प्रदर्शित अभिनेता आर माधवन आणि अमित साध स्टारर वेब सीरिज ‘ब्रिद’ ची सीक्वेल आहे.