सातारा – आमच्या परिवाराने लोकांसाठीच काम केले आहे, उदयनराजे भोसले यांना सुध्दा हीच शिकवण आहे. त्यांना तुमची सेवा करायची आहे, असे सौ. दमयंतीराजे भोसले यांनी कोरेगाव येथील मेळाव्यात सांगितले.
सातारा लोकसभा मतदारसंघामधील महायुतीचे उमेदवार खासदार उदयनराजे भोसले यांच्या प्रचारासाठी त्यांच्या पत्नी दमयंतीराजे भोसले यांनी मतदारसंघ पिंजून काढायला सुरुवात केली आहे. कोरेगाव येथे दमयंतीराजे यांनी काँग्रेसवर जोरदार निशाणा साधला. मतदारसंघात आतापर्यंत त्यांनी 15 मेळावे घेतले. त्यांचा गाठीभेटी, संवाद आणि मेळावे असा कार्यक्रम सुरू आहे. कोरेगाव येथे रविवारी झालेल्या महिला मेळाव्यामध्ये दमयंतीराजे म्हणाल्या, उदयनराजे छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आहेत, हे कुटुंब राजकारणात पुढे आले तर आमचे काय होणार, अशी भीती काँग्रेसला नेहमी वाटायची.
म्हणून काँग्रेससोबत असताना उदयनराजेंना काँग्रेसने नेहमी बाजूला ठेवले. उदयनराजे यांनी आतापर्यंत संघर्ष काळ अनुभवला आहे. त्यांच्यासाठी काहीही सोपे नव्हते. उदयनराजे राजकारणात पुढे गेले तर कोणी थांबवू शकणार नाही असं काँग्रेसला वाटायचे. काँग्रेसने त्यांना नेहमी सोबत घेतले. पण मागे ठेवले. उदयनराजे यांनी काँग्रेसचा लगेच राजीनामा दिला होता.
त्यावेळी हे मलाही कळालं नव्हतं, असे त्यांनी सांगितले. मतदारसंघातील कामांसाठी त्यांनी पद सोडले. भाजपकडून विकासाला गती मिळू शकते, हे लक्षात घेऊन उदयनराजे यांनी भाजप सोडली नाही. महाविकास आघाडीमध्ये त्यांना ऑफर होती, पण त्यांनी भाजपच्या विकासाच्या दृष्टीकोनातून भाजपची साथ द्यायची ठरवली. हा पक्ष जास्तीत जास्त विकासकामे करत आहे. त्यामुळे सातारा लोकसभा मतदारसंघाचा विकास होणार आहे, असे दमयंतीराजे भोसले यांनी स्पष्ट केले.