शिक्षक, पदवीधर निवडणुकीसाठी आज मतदान; वाचा वेळ आणि मतदानाची पद्धत

पुणे जिल्ह्यातील मतदान केंद्र संख्या- 1,202 

पुणे  – विधानपरिषदेच्या पुणे विभाग शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी मंगळवारी (दि.1) मतदान होत असून विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निवडणुकीची तयारी पूर्ण झाली आहे. मतदानासाठीचे सर्व कर्मचारी मतदान केंद्रांवर पोहचले आहेत. करोनाच्या पार्श्वभूमीवर मतदान केंद्रांवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान करता येणार आहे. दरम्यान, पदवीधरसाठी पुणे विभागात 4 लाख 32 हजार, तर शिक्षक मतदारसंघासाठी 74 हजार 860 इतके मतदार आहेत. तर पुणे विभागात मिळून एकूण 1 हजार 202 मतदान केंद्र आहेत.

 

 

पदवीधर मतदारसंघासाठी एकूण 62 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अरुण लाड, तर भाजपकडून संग्राम देशमुख निवडणूक लढवत आहेत. इतर प्रमुख पक्षांचे उमेदवारदेखील या रिंगणात आहेत. शिक्षक मतदारसंघासाठी एकूण 35 उमेदवार रिंगणात आहेत. यामध्ये महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जयंत आसगावकर आणि भाजप पुरस्कृत जितेंद्र पवार हे निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, निवडणुकीची मतमोजणी दि. 3 डिसेंबर रोजी होणार आहे.

 

 

असे करतात मतदान

पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाची आहे. मतपत्रिकेवर उमेदवाराच्या नावासमोर चिन्हं छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात 1 पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत.

 

ही ओळखपत्रे ग्राह्य धरणार

विधानपरिषदेची पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणूकीसाठी मतदान केंद्रावर मतदारांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्र सादर करू न शकणाऱ्या मतदारांचे आधार कार्ड, वाहनचालक परवाना, पॅन कार्ड तसेच पारपत्र आदींसह नऊ कागदपत्रे मतदानासाठी ग्राह्य धरण्यात येतील, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.