विविधा : जॉर्ज एव्हरेस्ट

-माधव विद्वांस

भारतातील भौगोलिक सर्वेक्षणाचा पाया घालणारे कर्नल सर जॉर्ज एव्हरेस्ट यांचा आज स्मृतिदिन. त्यांच्या कार्याचा गौरव म्हणून नेपाळ तिबेट सीमेवरील सर्वोच्च शिखरास त्यांचे नाव देण्यात आले. त्यांनी एव्हरेस्ट शिखराची उंची मोजण्याचे काम राधानाथ सिकदर यांच्यावर सोपविले होते. हे जगातील सर्वात उंच शिखर ठरले. 

जॉर्ज यांचा जन्म 4 जुलै 1790 रोजी झाला होता. परंतु त्यांचे जन्मस्थान अनिश्‍चित आहे. (ग्रीनविच किंवा ग्वर्नवाले). मात्र 27 जानेवारी 1791 रोजी त्यांचा नामकरण विधी लंडनमधील ग्रीनविच येथील सेंट अल्फिज चर्चमध्ये झाला होता. त्यांचे वडील न्यायाधीश होते, त्यांच्या तीन मुलांपैकी एव्हरेस्ट हे मोठे पुत्र होते.

एव्हरेस्ट यांचे शिक्षण बार्किंगहॅमशायरच्या मार्लो येथील रॉयल मिलिटरी कॉलेज (कॅडेट शाखा) येथे झाले. मार्लो येथे लष्करी शिक्षण घेतल्यानंतर ते ईस्ट इंडिया कंपनीत दाखल झाले आणि वयाच्या 16 व्या वर्षी भारतात आले.सुरुवातीस लेफ्टनंट गव्हर्नर स्टेमफोर्ड रॅफल्स यांनी जावा बेटाचे सर्वेक्षण करण्यासाठी त्यांची नेमणूक केली.

वर्ष 1816 मध्ये ते बंगालमध्ये परतले, तेथे त्यांनी गंगा आणि हुगळी नदीचे सर्वेक्षण केले. त्यानंतर त्यांनी कलकत्ता ते बनारस पर्यंतच्या 640 किलोमीटर मार्गाचे सर्वेक्षण केले. एव्हरेस्ट एस. एस. ग्रेट ब्रिटनच्या पहिल्या महासागरी प्रवासात सामील झाले होते. वर्ष 1847 मध्ये एव्हरेस्टने मेरिडीओनल आर्क ऑफ इंडियाच्या दोन विभागांची मोजमाप प्रकाशित केले, त्यासाठी त्यांना रॉयल अस्ट्रॉनॉमिकल सोसायटीतर्फे पदक देण्यात आले. नंतर रॉयल एशियाटिक सोसायटी आणि रॉयल भौगोलिक सोसायटीच्या फेलोशिपसाठी त्यांची निवड झाली. त्यांना त्रिमिती सर्वेक्षणात विल्यम लॅम्बटनचा सहाय्यक म्हणून नेमण्यात आले आणि वर्ष 1823 मध्ये लॅम्बटनच्या जागेवर अधीक्षक म्हणून नियुक्‍त केले गेले.

हिमालयाच्या भारताच्या उत्तरेकडील नेपाळ ते कन्याकुमारी 2 हजार 400 किलोमीटर अंतराचे असलेल्या मेरिडियन चॅपचे सर्वेक्षण करण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती. रेल्वे, रस्ते, धरण बांधणी यासाठी त्रिमिती सर्व्हे हे क्‍लिष्ट काम ब्रिटिशांनी सुरू केले. त्याचा आजच्या घडीलाही उपयोग होत आहे. अशांत तिबेट भारत सीमेवर भारताकडून सध्या चालू असलेली रस्त्याची कामे या सर्व्हेवरच चालू आहेत. पूर्वीपेक्षा आता तांत्रिक बाजूमध्ये आमूलाग्र बदल झाला असला तरी पायाभूत कामे तत्कालीन अभियंत्यांनी केली आहेत. त्यानंतरच्या काही वर्षांत त्यांनी कन्याकुमारीपासून मध्यवर्ती प्रदेशातील विदिशा जिल्ह्यातील सिरोंजपर्यंतचे सर्वेक्षण पूर्ण केले. मात्र बदलत्या हवामानामुळे त्यांची तब्येत बिघडली.

ताप आणि संधिवातामुळे त्यांना अर्धांगवायू झाला. त्यामुळे वर्ष 1825 मध्ये उपचारासाठी ते इंग्लंडला रवाना झाले. उपचारादरम्यान मार्च 1827 मध्ये ते रॉयल सोसायटीचे फेलो म्हणून निवडले गेले. त्यांचा बहुतेक मोकळा वेळ ईस्ट इंडिया कंपनी करता चांगल्या उपकरणाचे संशोधन करण्यासाठी उपयोगी आला.

जून 1830 मध्ये, एव्हरेस्ट जीटीएसवर आपले काम सुरू ठेवण्यासाठी ते भारतात परत आले आणि त्याचवेळी भारताचे सर्वेअर जनरल म्हणून त्यांची नेमणूक झाली. अँड्य्रू स्कॉट वॉ यांच्या देखरेखीखाली केप कॉमोरिन (कन्याकुमारी) ते ब्रिटिश भारताच्या उत्तरेकडील सीमेपर्यंतची कामे वर्ष 1841 मध्ये पूर्ण झाली. यावेळी त्यांना काही घरगुती व प्रशासकीय कामामुळे मानसिक ताण आला होता म्हणून ईस्ट इंडिया कंपनीने त्यांचा वारस म्हणून वॉन्ट यांची नियुक्‍ती केली व वर्ष 1842 मध्ये त्यांनी राजीनामा दिला व ते इंग्लंडला परत आले. 1 डिसेंबर 1866 रोजी लंडन येथे त्यांचे निधन झाले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.