मुंबई – एकेकाळी बॉलीवूडची सर्वाधिक पेमेंट घेणारी अभिनेत्री कंगना राणावत हिला आता त्या इंडस्ट्रीत कामच मिळेनासे झाले आहे. त्यामुळे तिला टॅक्स भरणा करण्यातही अडचण येऊ लागली आहे.
ही बाब तिने स्वताच आपल्या इंस्टाग्रामवर पोस्टवर नमूद केली आहे. 34 वर्षीय अभिनेत्रीने मंगळवारी पोस्ट टाकून ही बाब नमूद केली आहे. तिने म्हटले आहे की, सध्या माझ्याकडे कामच नसल्याने मला टॅक्स भरायला विलंब झाला आहे. मी सध्याही हायेस्ट टॅक्स स्लॅब मध्ये येते.
त्यातील 45 टक्के टॅक्स मी भरला आहे. पण सध्या माझ्याकडे कामच नसल्याने गेल्या वर्षीचा निम्मा टॅक्स मी भरू शकलेले नाही. आयुष्यात पहिल्यांदाच माझ्यावर ही वेळ आली आहे असे तिने म्हटले आहे.
कंगनाला करोना झाला होता. त्यातून ती नुकतीच बरी झाली आहे. तिने म्हटले आहे की, माझ्या पेंडिंग टॅक्स रकमेवर सरकारकडून व्याज आकारणी केली जात आहे मात्र माझी त्या विषयी तक्रार नाही असेही तिने आपल्या पोस्ट मध्ये नमूद केले आहे.
आपल्यावर अवघड वेळ येते पण आपण त्यावर एकत्रितपणे मात करू शकतो असेही तिने म्हटले आहे. तिचा थलायवी हा द्विभाषिक चित्रपट रिलीज व्हायची ती वाट पहात आहे. करोनामुळे त्याचे प्रदर्शनही लांबले आहे. हा सिनेमा जयललितांच्या आत्मकहाणीवर सादर करण्यात आला आहे. तिचे अनेक चित्रपट प्रकल्प पाईपलाईन मध्ये आहेत.