- मोठी दुर्घटना टळली
- नाशिकच्या आठवणीने काळजाचा ठोका चुकला
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात बुधवारी (दि.9) ऑक्सिजन गळती झाली. परंतु सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही आणि अगदी थोड्या वेळातच परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. टॅंकरमधून वायसीएम रुग्णालयाच्या टॅंकमध्ये ऑक्सिजन भरत असताना आज सायंकाळी साडेसात वाजताच्या गळती झाली. काही दिवसांपूर्वी नाशिकच्या शासकीय रुग्णालयात ऑक्सिजन टॅंकमधून गळती होऊन रुग्णांचा जीव गेला होता. या घटनेच्या आठवणीने सगळ्यांच्याच काळजाचा ठेका चुकला.
पिंपरी चिंचवड महापालिकेचे वायसीएम रुग्णालयात बुधवारी सांयकाळी ऑक्सिजन भरताना टॅंकमधून अचानक गळती सुरू झाली. जास्तीत जास्त दाब चालविण्यासाठी व सोडण्यासाठी असलेली झडप खराब झाल्याने ही घटना घडली. टाकीची सफाई यंत्रणा असल्याने टाकीमधून कोणतेही नुकसान झाले नाही तसेच मोठ्या प्रमाणावर ऑक्सिजनची गळती झाली नाही. मात्र, यामुळे परिसरामध्ये भीतीचे वातावरण पसरले. घटनेची माहिती मिळताच मनपा आयुक्त राजेश पाटील, अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे यांच्यासह पालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
वायसीएम रुग्णालयात 300 रुग्ण आहेत. ज्या टाकीमधून ऑक्सिजनची गळती झाली त्या टाकीतून 30 आयसीयू बेड व 100 रुग्ण असलेल्या एका मजल्याचा पुरवठा होत होता. मात्र, त्यासाठीही पर्यायी व्यवस्था असल्याने काहीही अडचण आली नाही. सुदैवाने यामध्ये कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. परंतु या घटनेचा व्हिडीओ काही क्षणातच व्हायरल झाला आणि ऑक्सिजनच्या गळतीच्या बातमीने पिंपरी चिंचवडकरांच्या काळजाचा ठोका चुकला. पूर्वी नाशिक महापालिकेच्या रुग्णालयात ऑक्सिजनच्या टाकीमधून अशाच प्रकारे ऑक्सिजनची गळती झाली होती. त्यामध्ये अनेक रुग्णांना प्राण गमवावे लागले होते. त्या घटनेच्या पुनरावृत्तीच्या आशंकेने भीतीचे वातावरण पसरले. मात्र प्रशासनाने तातडीने वस्तुस्थिती आणि कोणतेही नुकसान झाले नसल्याचे तसेच कोणताही धोका नसल्याचे स्पष्ट केल्यावर नागरिकांचा जीव भांड्यात पडला.
वायसीएम रुग्णालयात सात वाजताच्या सुमारास ही घटना घडली आहे. टाकीमध्ये ऑक्सिजन भरत असताना टाकीच्या दाबात चढ उतार झाल्याने ही घटना घडली. ऑक्सिजन सुविधेचे ऑडिट केले होते. सर्व टाक्या व्यवस्थित असून त्यामधून योग्यरित्या ऑक्सिजन पुरवठा होत आहे. रुग्णालयातील सर्व रुग्ण सुखरुप असून कोणताही धोका नाही.
– राजेश पाटील, आयुक्तसुदैवाने यामध्ये कोणताही गंभीर प्रकार घडला नाही. पाच मिनिटांसाठी ही ऑक्सिजन गळती झाली होती. त्यानंतर तातडीने दुरुस्ती करून ऑक्सिजन टॅंकरमधून रुग्णालयाच्या टॅंकमध्ये पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.
– किरण गायकवाड, प्रमुख अग्निशामक विभाग.