पुणेकरांनो, सुटीदिवशीही सुरू राहणार करभरणा केंद्र

अभय'योजनेसाठी पालिका प्रशासनाचा निर्णय

पुणे – थकित मिळकतकर वसुलीसाठी महापालिका प्रशासनाने अभय योजना प्रस्तावित केली आहे. योजनेची मुदत 30 नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र, शनिवारपासून तीन दिवस शासकीय सुट्टी आली आहे. त्यामुळे करदात्यांच्या सुविधेसाठी 32 मिळकतकर भरणा केंद्र पुढील तीन दिवस सुरू ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती करसंकलन विभागाचे प्रमुख विलास कानडे यांनी दिली.

 

सकाळी 10 ते सायंकाळी 4 या वेळेत ही कार्यालये सुरू राहणार असून जास्तीत जास्त नागरिकांनी कर भरणा करावा असे आवाहन कानडे यांनी केले आहे. शहरातील 50 लाखांच्या आतील थकबाकीदारांसाठी अभय योजना लागू करण्यात आली आहे.

 

2 ऑक्टोबरपासून ही योजना सुरू आहे. मात्र, शनिवार आणि रविवारी शासकीय सुट्टी असल्याने तसेच सोमवारी गुरूनानक जयंती असल्याने, त्या दिवशीही शासकीय सुट्टी आहे. त्यामुळे सर्व शासकीय कार्यालये बंद असणार आहेत. मात्र, कर भरण्याची मुदत लक्षात घेता करदात्यांसाठी पालिकेकडून या तीनही दिवशी कार्यालये सुरू ठेवली जाणार आहेत.

 

एका दिवसात 27 कोटी जमा

या योजनेअंतर्गत आतापर्यंत पालिकेच्या तिजोरीत 275 कोटींचा महसूल जमा झाला आहे. शुक्रवारी दिवसभरात सुमारे 27 कोटींचा कर जमा झाला आहे. तर, या योजनेत आतापर्यंत दंडाच्या रकमेत महापालिकेने सुमारे 137 कोटी 48 लाख रुपयांच्या दंडाची सवलत दिली आहे. यापूर्वी महापालिकेने नोटबंदी काळात जाहीर केलेल्या अभय योजनेत 194 कोटींचा महसूल मिळाला होता. मात्र, यावेळी जवळपास 100 कोटींनी अधिक महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.