लाखणगाव – आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागात संततधार पावसामुळे टोमॅटो बागांवर रोगराईचा प्रादुर्भाव वाढला असून, फवारणीच्या खर्चात वाढ होणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. सध्या टोमॅटोला प्रतिकॅरेट प्रतवारीनुसार 350 रुपये ते 600 रुपये समाधानकारक बाजारभाव मिळत आहे.
लाखणगांव, देवगांव, काठापूर, पोंदेवाडी, पिंपळगांव, अवसरी, पारगांव इत्यादी गावांत टोमॅटोची तोडणी सुरू असली तरी संततधार पावसाने टोमॅटो बागांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. करपा आणि काळी टिक या रोगांमुळे शेतकऱ्यांना फवारणीचा खर्च वाढू लागला आहे. आंबेगाव तालुक्यात उन्हाळी हंगामात एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी सुमारे 400 एकर क्षेत्रात टोमॅटो रोपांची लागवड केली आहे.
शेतकरी नारायणगांव (ता. जुन्नर) येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या टोमॅटो मार्केटमध्ये दरवर्षी मोठ्या प्रमाणात टोमॅटोची विक्री करीत असतात. मागील तीन महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने अनेक शेतकऱ्यांनी तरकारी पिके घेतली नाहीत. ज्या शेतकऱ्यांनी तरकारी पिके घेतली, त्या पिकांना सध्या बऱ्यापैकी बाजारभाव मिळू लागला आहे. सध्या टोमॅटोच्या प्रतिकॅरेटला 350 ते 600 रुपये बाजारभाव मिळत आहे; परंतु सध्या स्थानिक व्यापाऱ्यांकडूनच खरेदी होत आहे.
उत्तर भारतातील खरेदी थांबली
दरवर्षी बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात उत्तर भारतीय व्यापारी टोमॅटोची खरेदी करीत असतात; परंतु टोमॅटोचा हंगाम चालू झाला तरी करोनामुळे हे व्यापारी अजून येथे आलेले नाहीत, त्यामुळे टोमॅटोला उठाव नसल्याने उत्पादक चिंतेत आहे. संबधित व्यापारी खरेदीसाठी आल्यावर टोमॅटोच्या बाजारभावात अजून तेजी होण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे.