मराठी भाषा संवर्धन समितीचे कामकाज ठप्प ः दीड वर्षात अवघ्या दोन सभा
दीपेश सुराणा
पिंपरी – महापालिका प्रशासनाकडूनच मराठीची गळचेपी केली जात आहे. महापालिकेने मराठी भाषा संवर्धनासाठी स्थापन केलेल्या मराठी राजभाषा संवर्धन समितीचे कामकाज सध्या ठप्प पडले आहे. दीड वर्षांमध्ये केवळ दोन सभा वगळता या समितीचे काम पुढे सरकलेले नाही. महापालिका प्रशासनाच्या अनास्थेमुळेच ही स्थिती निर्माण झाल्याचे चित्र समोर येत आहे.
महापालिकेमध्ये क्रीडा, कला, साहित्य व सांस्कृतिक समितीने 14 डिसेंबर 2018 च्या ठरावानुसार मराठी भाषा संवर्धन समितीला अधिकृत मान्यता दिली. त्यानंतर समितीची 7 मार्च 2019 ला पहिली सभा झाली. त्यामधे परिचय व सूचना सुचविण्यात आल्या. त्यानंतर तीन ते चार महिन्यांनी दुसरी सभा झाली. शहरात मराठी भाषा संवर्धनाच्या दृष्टीने सभासदांनी या बैठकीत विविध सूचना मांडल्या. मात्र, त्यानंतर संबंधित समितीची एकही सभा झाली नाही. तसेच, सभेत सभासदांनी केलेल्या सूचनांची देखील प्रशासनाकडून अंमलबजावणी करण्यात आली नाही.
प्रशासकीय कामकाजात मराठीचा वापर करण्याबाबत राज्य शासनाकडून वारंवार सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, मराठी भाषेच्या वापरामध्ये येणाऱ्या अडचणींबाबत उपाययोजना देखील सुचविण्यात आल्या आहेत. मराठीचा वापर करण्यास टाळाटाळ करणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांची एक वर्ष वेतनवाढ रोखण्याचा निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला आहे. राज्य सरकार मराठीचा वापर वाढावा, यासाठी प्रयत्न करीत असताना महापालिकेत स्थापन केलेल्या मराठी भाषा संवर्धन समितीच्या सभा होत नसतील, सदस्यांनी सांगितलेल्या सूचनांची अंमलबजावणी केली जात नसेल तर मराठी संवर्धनाचे काम कागदावर राहील, असे मत सदस्य व्यक्त करीत आहेत.
मराठी भाषा संवर्धन समितीच्या स्थापनेपासून केवळ दोनच बैठका झाल्या आहेत. संबंधित बैठकांमध्ये सदस्यांनी केलेल्या सूचनांची महापालिका प्रशासनाने अंमलबजावणी केलेली नाही. महापालिका प्रशासनाकडून मराठी संवर्धनाकडे होणारे दुर्लक्ष लक्षात घेता राज्य शासनाने महापालिका आयुक्तांना ताकीद द्यावी अथवा त्यांची वेतनवाढ थांबवावी.
– राज अहेरराव, सदस्य, मराठी भाषा संवर्धन समिती.
मराठी भाषा संवर्धन समितीला मराठी संवर्धनासाठी आवश्यक कार्यक्रम घेण्यासाठी महापालिकेने अर्थसंकल्पीय तरतूद करणे आवश्यक आहे. समिती सदस्यांनी यापूर्वी केलेल्या सूचनांची अंमलबजावणी करायला हवी. वर्षभरात किमान चार बैठका होणे गरजेचे आहे. त्या माध्यमातून समितीच्या कामकाजाचा दर तीन महिन्यांनी आढावा घेता येईल.
– राजन लाखे, समिती सदस्य तथा अध्यक्ष,
महाराष्ट्र साहित्य परिषद (पिंपरी-चिंचवड)
मराठी भाषा संवर्धन समितीमध्ये सदस्यांनी जे विषय मांडले त्यांचा पाठपुरावा महापालिका प्रशासनाकडून होणे अपेक्षित आहे. समितीच्या आत्तापर्यंत दोनच बैठका झाल्या आहेत. कोविड-19 मुळे सध्या निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता समितीची ऑनलाइन बैठक देखील घेता येईल.
– अपर्णा मोहिले, समिती सदस्य तथा माजी कार्यकारी
अध्यक्षा, चित्रपट परीक्षण मंडळ.