उंब्रज (प्रतिनिधी) – भाजीपाला दुकान बंद करायला सांगितल्याच्या कारणावरून तारळे, ता. पाटण येथील दूरक्षेत्रातील एका पोलीस कर्मचाऱ्यास एकाच कुटुंबातील चार जणांनी लोखंडी गज, दगड, लाकडी फळकूटाने मारहाण करून शिवीगाळ दमदाटी केल्याची घटना दि. 17 रोजी सायंकाळी घडली.
विशाल साहेबराव नलावडे (वय34) नेमणूक उंब्रज पोलीस ठाणे असे मारहाणीत जखमी झालेल्या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव आहे. नारायण बाजीराव यादव (वय48), कमल नारायण यादव (वय47), स्वरूपा नारायण यादव (वय22), स्वरूप नारायण यादव (वय24) अशी मारहाण प्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेली अशी की, करोना महामारी पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दुकाने सायंकाळी 5 वाजता बंद करण्याचे आदेश दिले आहेत. असे असतानाही तारळे येथील ग्रामपंचायतीच्या पाठीमागे भाजीपाला दुकान सुरू असताना पोलीस कर्मचारी नलावडे यांनी दुकान बंद करण्यास सांगितले. त्यावेळी दुकानदार नारायण यादव हा हातात लोखंडी गज घेऊन धाऊन आला. याच दरम्यान यादव याची पत्नी कोमल यादव दगड घेऊन अंगावर येऊन हिजड्यांनो तमाशा करायला आलायं. माझ्या नवऱ्याचे दूकान का बंद करायला सांगतायं असे म्हणून मुलगी स्वरूपा हिने शिवीगाळ दमदाटी केली. तर मुलगा स्वरुप याने लाकडी फळकूटाने मारहाण केली. यामध्ये पोलीस कर्मचारी जखमी झाला असल्याचे दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. प्रकरणी असल्याचे चौघाजणांवर तारळे दूरक्षेत्र पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्याद पोलीस विशाल नलावडे यांनी दिली आहे.