पुणेकरांनी घेतला सूर्यग्रहणाचा अनुभव : शहरात पाहण्यास मिळाले ग्रहणाचे खंडग्रास स्वरूप
पुणे – शहरातून दिसणारे सूर्यग्रहण पाहण्यासाठी अनेक ठिकाणी नागरिकांमध्ये उत्साह दिसून आला. अनेकांनी आपल्या घराच्या गच्चीवरून, मोकळ्या जागेतून सूर्यग्रहण पाहिले. त्याचबरोबर विविध संस्थांतर्फे आयोजित ऑनलाइन प्रक्षेपणाला उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. ग्रहण काळात अनेकांनी घराबाहेर न पडण्याला प्राधान्य दिले. त्यामुळे ग्रहण सुरू झाल्यानंतर शहरातील रस्त्यांवर बरीच शांतता होती.
सूर्य, पृथ्वी आणि चंद्र एकाच रेषेत आल्यानंतर जी स्थिती तयार होते, त्या स्थितीला ग्रहण म्हटले जाते. सूर्यग्रहणावेळी चंद्र त्याच्या कक्षेत पृथ्वीपासून दूर अंतरावर असतो. त्याचा आकार सूर्यापेक्षा लहान दिसतो आणि चंद्र सूर्यासमोर आल्यावर तो सूर्याला पूर्णपणे झाकू शकत नाही. अशा स्थितीत अमावस्येच्या चंद्राभोवती सूर्याची तेजस्वी कडी दिसून येते. या ग्रहणाला कंकणाकृती सूर्यग्रहण म्हणतात. वास्तविक कंकणाकृती असलेल्या सूर्यग्रहणाचे पुण्यातून मात्र खंडग्रास स्वरूप पाहायला मिळाले.
ग्रहणाचे थेट प्रक्षेपण
“आयुका’ आणि इतर खगोलशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या संस्थाकडून ग्रहणाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. तर, विशेषत: लहान मुलांमध्ये सूर्यग्रहण पाहण्यासाठी मोठी उत्सुकता होती. एक्सरे फिल्म, ग्रहण पाहण्यासाठी असलेला विशेष चष्मा यांच्या सहाय्याने हे ग्रहण पाहिले. कामनिमित्त घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांनी शहरातील विविध पुलांवरून, मोकळ्या जागेतून ग्रहण पाहिले.