नवी दिल्ली – कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर चीन प्रकरणावरून आपला हल्ला अधिक तीव्र केला आहे. आज त्यांनी नरेंद्र मोदी यांचा उल्लेख सरेंडर मोदी मोदी असा केला आहे. ट्विटरवर सरेंडर मोदी असा पंतप्रधानांचा उल्लेख करताना राहुल गांधी यांनी मोदी यांच्या विषयी जपानच्या एका वृत्तपत्रात आलेल्या लेखाचाही संदर्भ दिला आहे. त्यात मोदींनी चीनला समर्थपणे तोंड देण्याऐवजी त्यांच्या खुषमस्करीचाच मार्ग पत्त्करला असल्याचे तपशीलवारपणे नमूद करण्यात आले आहे.
गेले काही दिवस राहुल गांधी हे चीनने भारतात केलेल्या आक्रमणाविषयी त्यांच्यावर सडकून टीका करीत आहेत. चीनने भारतात अतिकम्रण केलेच नाही असे विधान मोदींनी केल्यानंतर राहुल गांधी यांनी मोदींवर निशाणा साधताना भारताची भूमी मोदींनी चीनला आंदण दिली असल्याची टीका केली होती.
दरम्यान आज राहुल गांधी यांच्या टीकेवर भाजपनेही जोरदार प्रहार करीत संताप व्यक्त केला आहे. त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते शहानवाज हुसेन म्हणाले की, राहुल गांधी यांनी मोदींवर टीका करताना सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. त्यांनी पंतप्रधानांविषयी गेले काही दिवस जी भाषा वापरली आहे तशी भाषा देशाचे शत्रुही वापरत नाहीत असे त्यांनी म्हटले आहे.
त्यांना सरेंडरचे स्पेलिंगही नीट लिहीता आलेले नाही. त्यांनी आपल्या व्यक्तीगत राजकीय अजेंड्यासाठी मोदींवर ज्या भाषेत टीका केली आहे त्यातून साऱ्या देशात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे असा दावाही शहानवाज हुसेन यांनी केला आहे. राहुल गांधी यांनी देशाचा व सैनिकांचाही अपमान केल्याचा दावा त्यांनी केला.