नवी दिल्ली:भारताचा उदयोन्मुख खेळाडू लक्ष्य सेन याने सारलक्स खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले. अंतिम लढतीत लक्ष्यने चीनच्या वेंग हॉंग यांगला 17-21, 21-18, 21-16 असे पराभूत केले.
जागतिक क्रमवारीत लक्ष्य 51व्या, तर वेंग 102व्या क्रमांकावर आहे. यापूर्वी हे दोघे तीन वेळा आमनेसामने आले होते. त्यात लक्ष्यने एकदा, तर वेंगने दोन वेळा बाजी मारली होती. याच वर्षी वेंगने लक्ष्यला दोनदा पराभूत केले होते.
दोघांनी एकेक गेम जिंकून बरोबरी केली होती, त्यामुळे तिसऱ्या निर्णायक गेममध्ये दोघेही आक्रमक खेळ करत होते. यावेळी मात्र लक्ष्यने वेंगचे आव्हान मोडून काढले. प्रत्येक पॉइंट मिळविण्यासाठी दोघांमध्ये चुरस रंगली होती. 13-13 अशी बरोबरी असताना वेंगने सलग तीन पॉइंट घेतले.
अर्थात, वेंगकडे 16-13 अशी आघाडी होती. मात्र, त्यानंतर सलग आठ पॉइंट घेत लक्ष्यने विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. ही लढत तासभर चालली. या वर्षातील लक्ष्यचे हे तिसरे आंतरराष्ट्रीय जेतेपद ठरले. यापूर्वी, सुपर 100मधील डच ओपन स्पर्धा आणि बेल्जियन इंटरनॅशनल स्पर्धा जिंकली होती.