खडकवासला मतदारसंघात कमालीची चुरशीची लढत : 2,603 मतांनी विजयश्री
पुणे – खडकवासला विधानसभा मतदारसंघात महायुती आणि आघाडीची चांगलीच चुरस पहायला मिळाली. अखेर या चुरशीच्या लढतीमध्ये महायुतीचे भीमराव तापकीर यांच्या हातातून निसटत चालेला विजय शेवटच्या टप्प्यात हातात आला. 2 हजार 595 मताधिक्य मिळवत तापकीर यांनी हॅटट्रिक करत खडकवासल्याचा “गड’ राखला.
खडकवासला मतदारसंघात महायुतीचे भीमराव तापकीर, आघाडीचे सचिन दोडके यांच्यासह एकूण 7 उमेदवार रिंगणात होते. त्यामध्ये मुख्य लढत ही तापकीर आणि दोडके यांच्यात होणार हे निश्चित होते. त्यानुसार दोन्ही “पैलवानांनी आखाड्यात चांगलीच चुरशीची लढत दिली.’ भीमराव तापकीर यांना एकूण 1 लाख 20 हजार 518 मते मिळाली तर, सचिन दोडके यांना 1 लाख 17 हजार 923 मते पडली. वंचित बहुजन आघाडीचे आप्पा आखाडे यांनी 5 हजार 931 मते मिळवली आहेत. अन्य एक हजाराचाही टप्पा पार केला नाही.
शेवटच्या 5 ते 6 फेऱ्यांमध्ये दोन्ही उमेदवारांमध्ये 1 ते 2 हजारांचा फरक होता. त्यामुळे नक्की कोणी बाजी मारली, हे स्पष्ट होत नसल्यामुळे कार्यकर्ते “वेट ऍन्ड वॉच’च्या भूमिकेत होते. दुपारी तीननंतर तापकीर यांचा विजयी झाल्याचे स्पष्ट झाल्यावर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाचे वातावरण होते. दरम्यान, 2014 मध्ये भीमराव तापकीर यांना 63 हजारांचे मताधिक्य मिळाले होते. यावेळी मताधिक्यांमध्ये वाढ होईल, अशी शक्यता महायुतीला होती. परंतु, यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून नवीन चेहरा देण्यात आला. त्यामुळे तापकीर यांना विजय मिळविताना “आखाड्यात चांगलीच लढत द्यावी लागली.’ त्यावेळी कुठे अडीच हजारांचे मताधिक्य मिळवत यश मिळाले. त्यामुळे खडकवासल्याची निवडणूक चांगलीच चर्चेत राहिली.
3 हजार 560 “नोटा’ मतदान
खडकवासला विधानसभा मतदारसंघात एकूण 2 लाख 50 हजार 66 मतदान झाले. त्यामध्ये नोटांचा (यापैकी एकही उमेदवार नाही) वापर अधिक झाल्याचे दिसून येते. महायुती आणि आघाडीचे दोन उमेदवार तसेच वंचित बहुजन आघाडीचे उमेदवारांची मते सोडली तर, अन्य चार जणांनी 1 हजार मतांचाही टप्पा पार केला नाही. त्यामध्ये उमेदवारांच्या मतापेक्षा नोटांचा वापर अधिक झाला आहे. यावेळी तब्बल 3 हजार 560 मतदारांनी नोटाचे बटन दाबत सातही उमेदवारांना नाकारले.