सत्यजित पाटणकरांचा पराभव; आ. देसाईंचे मताधिक्य घटले
पाटण – संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागलेल्या पाटण विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचे विद्यमान आमदार शंभूराज देसाई यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. सुरुवातीपासून अटीतटीच्या झालेल्या लढाईत शंभूराज यांनी त्यांचे पारंपरिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाटणकर घराण्यातील सत्यजित यांच्यावर 14 हजार 226 मतांनी विजयश्री मिळवली. गत निवडणुकीपेक्षा आ. देसाई यांचे मताधिक्य चार हजार 598 ने घटले. 2014 मध्ये आ. देसाई यांनी सत्यजित यांच्यावर 18 हजार 824 मतांनी विजय मिळवला होता.
महायुती आणि आघाडीच्या नेत्यांच्या सभांमुळे आणि नियोजनबद्ध प्रचारामुळे ही निवडणूक उत्कंठावर्धक होईल, असे चित्र निर्माण झाले होते. प्रत्यक्षात झालेली तसेच. या निवडणुकीत शिवसेना-भाजप व मित्रपक्षांच्या महायुतीचे उमेदवार शंभूराज देसाई यांना 1,06,339 तर त्यांचे प्रतिस्पर्धी आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस, राष्ट्रीय कॉंग्रेस व मित्रपक्षांच्या महाआघाडीचे उमेदवार सत्यजित पाटणकर यांना 91,739 मिळाली.
सातारा येथील एमआयडीसीमधील शासकीय गोदामात मतमोजणीला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. पहिल्या फेरीत आ. शंभूराज देसाई यांना 1851 तर सत्यजित पाटणकर यांना 1730 मते पडली. या फेरीत आ. देसाई यांना केवळ 121 मताची आघाडी मिळाली होती. तिसऱ्या फेरीत आ. देसाई यांना 6378 तर सत्यजितसिंह यांना 5074 मते पडली आणि देसाई यांना 1304 मताची आघाडी मिळाली. चौथ्या फेरीत देसाई यांना 8193 तर पाटणकर यांना 7332 मते पडली. या फेरीत देसाई यांनी 861 मतांची आघाडी मिळाली.
पाचव्या फेरीत देसाई यांना 10,719 तर पाटणकर यांना 9786 मते पडली. या फेरीत देसाई यांनी 933 मतांची आघाडी घेतली. त्यानंतर पुढच्या फेऱ्यांमध्ये देसाई यांनी आपली आघाडी थोडी थोडी वाढवत नेली. अकराव्या फेरीत देसाई यांना 28,462 तर पाटणकर यांना 26,444 मते पडून देसाई यांनी 2018 मतांची आघाडी घेतली. ही आघाडी त्यांनी टिकवून ठेवली. सुरुवातीपासून देसाई यांनी घेतलेले मताधिक्य कमी करण्यात पाटणकर यांना अपयश आल्याने देसाई यांनी सलग दुसऱ्यांदा विजय मिळवला.
पाटणकर घराण्याचे पारंपरिक वर्चस्व असलेल्या कोयना, पाटण, चाफळ, तारळे या भागात मतधिक्य घटल्याचा फटका सत्यजितसिंह यांना बसला. पंचायत समितीचे उपसभापती राजाभाऊ शेलार, जिल्हा परिषद सदस्य बापूराव जाधव असे कसलेले कार्यकर्ते असतानाही ते या भागातून सत्यजित यांना म्हणावे तसे मताधिक्य देऊ शकले नाहीत. कोयना भागात राष्ट्रवादीला अपेक्षेपेक्षा कमी मतदान झाले. तारळे भागातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची मोठी फौज असताना या भागात पाटणकर यांना अपेक्षित मते मिळाली नाहीत. चाफळ भागातही त्यांची पीछेहाट झाली.
आ. शंभूराज देसाई यांनाही त्यांचे वर्चस्व असलेल्या सुपने, तांबवे भागात काही मतांचा फटका बसला. कुंभारगाव, काळगाव या ठिकाणी मात्र त्यांना अपेक्षित मतदान मिळाले. त्या तुलनेत सत्यजितसिंह यांना या भागात मोठा फटका बसला. सकाळी आठ वाजता सुरू झालेली मतमोजणी दुपारी चार वाजता संपली. मात्र, अधिकृत निकाल जाहीर होण्यापूर्वीच आ. देसाई यांचा विजय निश्चित झाल्याने समर्थकांनी गुलालाची उधळण व फटाक्यांची आतषबाजी करून देसाई यांच्या विजयाच्या घोषणा दिल्या. निकालानंतर कार्यकर्त्यांनी फटाक्यांच्या आतषबाजीत जल्लोष केला.