सासवड – पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील दिवे घाटातील वडकीच्या बाजूने सुरुवातीच्या वळणावरच अल्कोहोलने भरलेल्या टॅंकरने दोन दुचाकीस्वारांना चिरडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघातानंतर टॅंकर खोल दरीत कोसळला. दरम्यान, अपघातात टॅंकरचालकासह अन्य एकजण जण गंभीर जखमी झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. हा अपघात सायंकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घडला.
जगन्नाथ पवार (रा. भिवडी ता पुरंदर वय 38) असे मृत्यू झालेल्याचे नाव आहे. दुसऱ्या दुचाकीस्वाराचे नाव रात्री उशीरापर्यंत समजले नव्हते. पुणे-पंढरपूर पालखी महामार्गावरील वडकीच्या बाजूने सासवडकडे चढणाऱ्या दोन दुचाकी (एमएच 12 टीएफ 7328) व (एमएच 12 पीएल 3397) वडकी वरून सासवडच्या दिशेने जात होते. त्याचवेळी सासवडकडून वडकीकडे निघालेल्या अल्कोहोलने भरलेल्या टॅंकर चालकाचा ताबा सुटून दुचाकीस्वारांना जागीच चिरडून घाटामध्ये खोल दरीत कोसळला.
या अपघातात दोन दुचाकीस्वरांनाचा जागीच मृत्यू झाला आहे तर टॅंकर चालक व इतर एक जण गंभीर जखमी झाला असल्याची माहिती घटनास्थळावरून प्रत्यक्ष दर्शनी सांगितले. तर जखमींना सासवड येथील खासगी रुग्णालयात दाखल केले आहे. घटनास्थळी वडकी व लोणी काळभोर पोलीस दाखल झाले आहेत. पुढील तपास सहाय्यक पोलीस अधीक्षक विक्रम देशमुख, सहाय्यक पोलीस आयुक्त बजरंग देसाई तपास करत आहेत.