मुंबई – “जी-20′ अंतर्गत तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे नियोजन सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने करावे, अशा सूचना मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी आज येथे दिल्या. मुंबई येथे 15 ते 17 मेदरम्यान तिसऱ्या एनर्जी ट्रान्झिशन वर्किंग ग्रुपच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
या बैठकांसाठी करण्यात आलेल्या नियोजनाचा आढावा घेण्यासाठी मुख्य सचिव मनोज सौनिक यांनी बैठक घेतली. बैठकीत नवी दिल्लीतून केंद्रीय ऊर्जा सचिव आलोक कुमार यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभाग घेतला.
या बैठकीस पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, ऊर्जा विभाग प्रधान सचिव आभा शुक्ला, मुंबई महापालिका अतिरिक्त आयुक्त वेलारासू, शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजित सिंह देओल, आरोग्य सेवा आयुक्त धीरज कुमार, उद्योग विकास आयुक्त माणिक गुरसळ, माहिती संचालक हेमराज बागुल, सांस्कृतिक कार्य संचालक बिभीषण चवरे उपस्थित होते.