पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) -पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या काही विभागांमार्फत निविदेतील कामकाज पूर्ण झाल्यानंतर व अनामत रक्कम पूर्ततेपूर्वी संपूर्ण फायलींचे निविदा सुरू झाल्यापासूनच्या सर्व बिलांसहित लेखापरीक्षण केले जाते. हे लेखापरीक्षण करताना नियमांनुसार मोजमाप पुस्तकांमधील नोंदी ठेवल्या जात नाहीत. लेखापरीक्षणात मोजमाप पुस्तकातील नोंदीबाबत आक्षेप घेतलेल्या त्रुटींची दुरुस्ती करून पूर्वीचे पृष्ठ काढून दुरुस्तीचे पृष्ठ नव्याने समाविष्ट केल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत राज्य सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागाने तयार केलेल्या नियमावलीतील तरतुदी लागू करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. त्यामुळे मोजमाप पुस्तक संगणकीकृत मोजमापे नोंदी करताना नियमातील तरतुदींचे पालन होणे अपेक्षित आहे.
याबाबत महापालिकेचे मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले यांनी परिपत्रक काढले आहे. महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षण विभागामार्फत लेखापरीक्षण कामकाज गतिमान करण्यासाठी प्रचलित लेखापरीक्षण कार्यपद्धतीमध्ये आर्थिक वर्ष सन 2022-23पासून सुधारणा करण्यात आली आहे. या कामकाजाच्या अनुषंगाने स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा व जलनि:सारण विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या निविदेतील कामकाज पूर्ण झाल्यानंतर व अनामत रक्कम पूर्ततेपूर्वी संपूर्ण निविदा फायलींचे निविदा सुरू झाल्यापासूनच्या सर्व बिलांसहित लेखापरीक्षण केले जात आहे. हे लेखापरीक्षण करीत असताना मोजमाप पुस्तके संबंधित फायलींसोबत लेखापरीक्षणासाठी प्राप्त होत असतात. त्यानुसार मोजमापे घेण्याबद्दलचे आणि मोजमाप नोंदवह्या ठेवण्यासंबंधी तरतुदी करण्यात आल्या आहेत.
दोन वर्षाचा अनुभव असणाऱ्या अभियंतांनानाच अधिकार
मोजमापे नोंदवण्याचे अधिकार हे अभियंता पदावर ज्यांची नेमणूक करण्यात आली व त्यांची सेवा किमान दोन वर्षाचा अनुभव आहे अशा अभियंतांना मोजमापे लिहिण्याचा अधिकार आहे. ज्यावेळी कामाच्या किंवा भांडारच्या कार्यकारी प्रभारी अधिकाऱ्यांची किंवा दुय्यम अधिकाऱ्याची बदली होते, त्यावेळी त्याने त्याला देण्यात आलेल्या सर्व मोजमाप विषयक नोंदवह्या त्याच्या उत्तराधिकाऱ्याकडे हस्तांतरीत करण्यात आणि कार्यमुक्त व कार्यमोचक अधिकाऱ्यांनी तारखेनिशी त्यांच्या सह्या करुन नोंदवह्यांच्या सुचीमध्ये नोंद करावी. मोजमाप नोंदवहीमध्ये नोंदी केल्यानंतर मोजमाप नोंद करणाऱ्या अधिकाऱ्याने आपण स्वत: हिशोब करण्यात आले आहेत व त्याच्या नोंदी केल्या आहेत असे शेवटी तारखेनिशी आपल्या सहीने प्रमाणित करणेत यावे. मोजमाप नोंदवहीतुन कोणतेही पृष्ठ काढुन टाकण्यात येऊ नये. नोंद केलेली मोजमापे ही ठेकेदाराने स्वीकारण्याचे दर्शक म्हणून ठेकेदाराची सही घ्यावी असे तरतुदीत स्पष्ट करण्यात आले आहे.