वडगाव मावळ, दि. 9 (प्रतिनिधी) – शेतीपुरक पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीकडून पोल्ट्री शेडवर आकारणी करण्यात येत असलेली घरपट्टी (पोल्ट्री टॅक्स) माफ करण्यात यावा, असा ठराव मावळ तालुका पोल्ट्री योद्धा संघटनेच्या विशेष सभेत मंजूर करण्यात आला.
वडगाव मावळ येथे संघटनेची विशेष सभा पोल्ट्री व्यावसायिक एकनाथ गाडे यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन समितीचे माजी सभापती बाबुराव वायकर होते. यावेळी संघटनेचे कार्याध्यक्ष सुभाष केदारी, उपाध्यक्ष उत्तम शिंदे, संतोष घारे, सोमनाथ राक्षे, सचिव प्रविण शिंदे, सहसचिव महेश कुडले, खजिनदार विनायक बधाले, सचिन आवटे, संभाजी केदारी, संभाजी शिंदे आदी उपस्थित होते.
मावळ तालुक्यात अनेक शेतकरी शेतीला जोडधंदा म्हणून पोल्ट्री व्यवसाय करीत आहेत. त्यांनी उभारलेल्या पोल्ट्री शेडवर ग्रामपंचायतीकडून अवास्तव घरपट्टी (पोल्ट्री टॅक्स) आकारण्यात येत आहे. काही ग्रामपंचायतींकडून तर गावातील बंगल्यापेक्षा जास्त आकारणी होत आहे. वास्तविक पाहता पोल्ट्री हा व्यवसाय शेती व्यवसाय म्हणून आहे. शेती व्यवसायावर कोणताही कर नाही.मात्र शेतीपूरक पोल्ट्री व्यवसायाला ग्रामपंचायतीकडून पोल्ट्रीशेडवर टॅक्स आकारणी होत आहे. ही कर आकारणी अन्यायकारक असल्याने त्वरित रद्द करण्यात यावी, अशी एकमुखी मागणी या सभेत करण्यात आली. हा ठराव संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यानी सभेत मांडला. त्याला सभेतील सर्व उपस्थितांनी एकमुखी पाठिंबा दिला.
आपल्या या मागणीसाठी आपण मावळ पंचायत समिती आणि पुणे जिल्हा परिषदेकडे विशेष प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी कृषी सभापती बाबुराव वायकर यांनी दिली. संघटनेच्या भक्कम बांधणीसाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन अध्यक्ष एकनाथ गाडे यांनी केले आहे. सोनबा गोपाळे गुरूजी यांनी आभार मानले.