पिंपरी, दि. 9 (प्रतिनिधी) – सह्याद्री देवराईच्या सहकाऱ्यांच्या योगदानाने राज्यात वृक्षलागवड दिवसेंदिवस वाढत आहे. यासाठी वन विभागाचे सहकार्य वाढत आहे. संस्थेच्या वतीने पुण्यात देवराई करणार आहोत. सीड बॅंक करणार आहोत, असे सयाजी शिंदे यांनी सांगितले. कवी अरविंद जगताप यांची मुळांचे कुळ घेऊ, खोडांचे बळ होऊ, झाडाचे गुण घेऊ, झाडाचे गुण गाऊ, ही कविता शिंदे यांनी भाषणादरम्यान सादर केली.
चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे सभागृहात सह्याद्री देवराई संस्थेच्या सदस्यांसाठी रविवार (दि. 9) रोजी वृक्ष संवाद 2022 हा कार्यक्रम आयोजित केला होता. मंचावरील कुंडीतील झाडाला अध्यक्षपदाचा मान देऊन आगळा पायंडा या कार्यक्रमाद्वारे पाडण्यात आला. या वेळी पुणे वन विभागाचे उपवनसंरक्षक राहुल पाटील, अभिनेते सयाजी शिंदे, लेखक अरविंद जगताप, डॉ. चंद्रकांत साळुंखे, सतीश आवटे यांनी मार्गदर्शन केले. श्रीकांत इंगळहळ्ळीकर, धनंजय शेडबाळे, विजय निंबाळकर, मधुकर फल्ले यांच्यासह वृक्षप्रेमी उपस्थित होते. यशस्वी वृक्षलागवड करणाऱ्यांचा, संस्थेच्या कृतिशील सदस्यांचा आणि सी. एस. आर. फंडच्या माध्यमातून वृक्ष लागवडीला मदत करणाऱ्यांना देशी वृक्षांच्या बियांच्या वृक्षांची थैली भेट देऊन सत्कार करण्यात आला. देशी वृक्षांच्या बियांचे प्रदर्शनही मांडण्यात आले होते. राहुल पाटील म्हणाले, मजे कोणी वृक्ष लावतात, वाढवतात ते सर्व वृक्षसंरक्षक असतात. सह्याद्री देवराईच्या माध्यमातून हे मोठे काम महाराष्ट्रात उभे राहत आहे. वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देणाऱ्या, सयाजी शिंदे यांच्या आवाजातील गीताचे प्रकाशन यावेळी करण्यात आले. संस्थेने महाराष्ट्रात 10 लाख वृक्षलागवड केल्याची माहिती देण्यात आली.