स्वतःचे रक्त वापरून चित्र तयार करण्याच्या प्रथेवर नियंत्रण
चेन्नई : तमिळनाडू सरकारने दोन दिवसापूर्वी एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून ब्लड पेंटिंग या कलाप्रकारावर संपूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. या प्रकारात स्वतःचे रक्त काढून त्याच्यापासून चित्र तयार करून ते वाढदिवसाचे गिफ्ट म्हणून किंवा इतर कारणांनी भेट वस्तू म्हणून देण्याची प्रथा तामिळनाडू राज्यात लोकप्रिय होत असतानाच तामिळनाडू सरकारने या प्रथेवर बंदी घातली आहे. म्हणजेच यापुढे कोणीही आता स्वतःच्या रक्ताचा वापर करून चित्र काढू शकणार नाही.
गेल्या काही कालावधीमध्ये हा चित्रप्रकार तामिळनाडूमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाला होता आणि अशा प्रकारे रक्ताचा वापर करून चित्र काढणाऱ्या कलाकारांनी काही स्टुडिओ सुद्धा उभारले होते. ज्याला अशा प्रकारचे चित्र काढून घ्यायचे आहे त्याला स्वतःचे रक्त द्यावे लागत असे त्या रक्ताचा वापर करून हे चित्रकार त्यांना पाहिजे ते चित्र काढून देत असत. ए फोर साईजच्या कागदावर चित्र काढून देण्यासाठी पाच मिलिमीटर रक्ताची गरज लागत असे.
अनेक तरुणांनी क्रेझ म्हणून आपल्या मित्राला किंवा मैत्रिणीला वाढदिवसा दिवशी तिचे किंवा त्याचे पेंटिंग गिफ्ट देण्यासाठी स्वतःचे रक्त देऊन अशाप्रकारे चित्र काढून घेतली आहेत. गेल्या महिन्यामध्ये तामिळनाडूचे आरोग्य मंत्री एम ए सुब्रमण्यम यांनी अचानक चेन्नई मधील एका अशा स्टुडिओला भेट दिली तेव्हा त्यांच्या लक्षात ज्या गोष्टी आल्या त्या विचित्र असल्यामुळे त्यांनी लगेचच अशा प्रकारच्या कला प्रकारावर बंदी घालण्याचा निर्णय घेतला.
एकतर अशा प्रकारे ब्लड पेंटिंगसाठी जे रक्त जमा करण्यात येत होते ते रक्त काढण्यासाठी कोणतीही शास्त्रीय प्रक्रिया वापरण्यात येत नव्हती. मानवी रक्त हे अतिशय मौल्यवान असून रक्तदानासाठी हे अतिशय महत्त्वाचे असते पण रक्तदानाव्यतिरिक्त अशा प्रकारे रक्ताचा वापर करणे चुकीचे असल्याचे तामिळनाडू सरकारच्या लक्षात आल्यानेच त्यांनी या ब्लड पेंटिंगवर बंदी घातली आहे.
यापुढे कोणत्याही व्यक्तीने स्वतःच्या रक्ताचा वापर पेंटिंग करण्यासाठी किंवा एखाद्या संस्थेने अशा प्रकारे रक्ताचा वापर करून कोणाला पेंटिंग काढून दिले तर त्याच्यावर फौजदारी कारवाई केली जाईल अशी घोषणा तामिळनाडू सरकारतर्फे करण्यात आली आहे .प्रेम आणि आपुलकी दाखवण्यासाठी इतर अनेक मार्ग आहेत त्यासाठी रक्ताचा वापर करण्याची कोणतीही गरज नाही असे मंत्री सुब्रमण्यम यांनी याबाबत म्हटले आहे.