चेन्नई/मदुराई – तामिळनाडूच्या राजभवनाबाहेर पेट्रोल बॉम्ब फेकल्याप्रकरणी पोलिसांनी तपास करून माहिती दिली आहे आणि सीसीटीव्ही फुटेजही दाखवले आहे. मात्र राजभवनातून खोटी माहिती दिली जात आहे. राज्यपाल स्वतः भाजप कार्यकर्त्याप्रमाणे वागत असून राजभवन हे भाजपचे कार्यालय झाले आहे.
हे लाजीरवाणे आहे, अशा शब्दांत तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी राज्यपाल आरएन रवी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. महाराष्ट्रात भगतसिंग कोश्यारी कार्यरत असताना ज्याप्रमाणे सरकारविरोधी निर्णय घेतले जात होते, त्याची पुनरावृत्ती तामिळनाडूमध्ये होत असल्याची चर्चा आहे.
स्टॅलिन यांनी सोमवारी मदुराई येथे स्वातंत्र्यसैनिक पसुम्पोन मुथुरामलिंगा थेवर यांना आदरांजली वाहिली. त्यावेळी त्यांनी राज्यपालांवर गंभीर आरोप केले. अलीकडेच सीएम स्टॅलिन यांनीही अप्रत्यक्षपणे राज्यपाल आरएन रवी यांच्यावर आरोप केले होते. सीएम म्हणाले होते की उच्च पदांवर असलेले काही लोक द्रविड विचारधारा आणि त्याच्या प्रशासनाच्या मॉडेलवर प्रश्न उपस्थित करत आहेत. वर्ष 2024 च्या लोकसभा निवडणुकीपर्यंत राज्यपाल रवी यांनी त्याच पदावर राहावे. त्यामुळे द्रमुकच्या प्रचाराला बळ मिळेल, असे मुख्यमंत्र्यांनी उपहासाने सांगितले.
नक्की काय घडले आहे?
नुकतीच तामिळनाडूमध्ये राजभवनाजवळ पेट्रोल बॉम्ब फेकल्याची घटना घडली. त्यानंतर भाजपने राज्य सरकारवर निशाणा साधत कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. याप्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून तो सीसीटीव्ही फुटेजमध्ये पेट्रोल बॉम्ब फेकताना दिसत आहे. या हल्ल्यात कोणीही जखमी झाले नाही.
राज्यपालांनी आरोप केला आहे की, पेट्रोल बॉम्बसह सशस्त्र काही हल्लेखोरांनी मुख्य गेटमधून राजभवनात प्रवेश करण्याचा प्रयत्न केला; परंतु सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या तत्परतेमुळे एक गंभीर अनुचित घटना टळली. राज्यपालांच्या सचिवांनीही या घटनेची पोलिसांकडे तक्रार केली होती आणि राज्यपालांवर यापूर्वी झालेल्या हल्ल्यांचाही उल्लेख केला होता.