काबूल – तब्बल दोन दशकांनंतर अफगाणिस्तानातून अमेरिकी लष्कराची घरवापसी सुरू झाली आहे. त्याचवेळी तालिबानचा प्रभावही वाढत चालला आहे. त्यांनी देशातील एकएक भाग ताब्यात घेण्यास सुरूवात केली असून आपली नियमावली जाहीर करण्यासही सुरूवात केली आहे.
तालिबानच्या राजवटीत देशाचे कायदे अधिक कठोर असतील. चोरांचे हात आणि पाय कापले जातील तर समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तीला थेट मृत्यूदंडाची शिक्षा दिली जाणार असल्याचे तालिबानी न्यायाधीशाने म्हटले आहे.
जर्मन वर्तमानपत्र बाइल्ड बोलताना तालिबानचा जज रहिम म्हणाला की, नुकतीच एका व्यक्तीने त्याच्या घरात चोरी झाल्याची तक्रार केली होती. तेव्हा आम्ही चोराचे हात कापण्याचे आदेश दिले आहेत. त्यावेळी चोराचे पायही कापायचे का, असे आपण तक्रारदाराला विचारल्यानंतर त्यांनी नकार दिल्यामुळे आपण पाय कापण्याचे आदेश दिले नाहीत.
स्मगलिंग आणि अपहरणाच्या गुन्ह्यात ताब्यात घेण्यात आलेल्या एका टोळीच्या संदर्भात देण्यात आलेल्या निवाड्याची माहिती देताना रहिम म्हणाला की अशा गुन्ह्यांमध्ये आम्ही हाताची बोटे कापण्यापासून सुरूवात करतो. त्यानंतर इतर अवयवही कापले जातात.
समलिंगी संबंध ठेवणाऱ्या व्यक्तींना मात्र मृत्यूदंडाचीच शिक्षा दिली जाणार असून कशाप्रकारे मारले जाइल हेही त्याने सांगितले. अशा व्यक्तीला किंवा व्यक्तींना दगडाने ठेचून किंवा आठ-दहा फूट उंच भिंत बांधून त्यांच्यावर पाडण्यात येईल अशा प्रकारे शिक्षा दिली जाईल.
यापूर्वी जेव्हा अफगाणिस्तानात तालिबानची राजवट स्थापन झाली होती तेव्हा त्याचा सगळ्यांत जास्त त्रास महिलांना भोगावा लागला होता. त्यामुळेच आताच्या बदलत्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर महिला अफगाणिस्तान सोडून जाण्याच्या तयारीत असल्याची माहितीही संबंधित वर्तमान पत्राच्या प्रतिनिधीने दिली आहे.
दरम्यान, महिलांच्या संदर्भात बोलताना रहिम म्हणाला की महिलांना घराबाहेर पडण्याची परवानगी असेल, मात्र त्यासाठी त्यांना अगोदर परमिट घ्यावे लागेल. तसेच मुली शाळेत जाउ शकतील मात्र महिला शिक्षक असली पाहिजे व त्यांनी हिजाब घालणे आवश्यक असेल.