कराड -खचाखच भरलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर तळबीड पोलिसांनी गुरुवारी सकाळी कारवाई केली. सदर कारवाईत डंपरसह वाळू असा लाखो रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेऊन वाळूने भरलेला डंपर पोलीस ठाणे आवारात आणून लावला होता. या कारवाईची तालुक्यात दिवसभर उलटसुलट चर्चा सुरू होती.
याबाबत पोलीस व महसूल विभागाकडून मिळालेली माहिती अशी की, उंब्रज ते मसूर रोडवर काठोकाठ शिग लावून भरलेल्या अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपर चालकाला तळबीड पोलिसांनी पकडले. संबंधित डंपर चालकाकडे चौकशी केली असता सदरची वाळू विनापरवाना वाहतूक करत असल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर वाळूने भरलेल्या डंपरला पोलिसांनी तळबीड पोलीस ठाण्यात आणून त्याच्या कारवाईचे काम दिवसभर सुरू होते. या प्रकाराची परिसरात दिवसभर चर्चा सुरू होती.
सदर कारवाईची नोंद रात्री उशिरापर्यंत तळबीड पोलिसांत झाली नव्हती. दरम्यान सदरचा डंपर तहसील कार्यालयात पाठवण्यात आला असल्याची माहिती तळबीड पोलिसांनी दिली. मात्र, गुरूवारी सायंकाळी 7 पर्यत संबंधित डंपर तहसीलदार कार्यालयात पोहोचला नसल्याचे तहसील कार्यालयातून सांगण्यात आल्याने कारवाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.