छत्रपती संभाजीनगर – सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्या, मराठा समाजाचा समावेश ओबीसीमध्ये करा, त्या नंतर सरकारने हवे तेवढे आरक्षण वाढवावे, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे पाटील यांनी दिली आहे. मराठा समाजातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी काही ठिकाणी मनुष्यबळ कमी आहे. ते वाढवण्यात यावे, अशी मागणी जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. मराठवाड्यातील कुणबी नोंदणी शोधण्याच्या कामाला वेग देण्याचीही मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली.
मुदतीबाबतही जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना इशारा दिला आहे. आम्हाला 24 डिसेंबरपर्यंतच आरक्षण हवे, असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. या बाबत मुख्यमंत्री कार्यालयातून फोनवर संपर्क झाला असल्याची माहिती देखील त्यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही एक-दोन दिवस प्रतीक्षा करत आहे. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनुष्यबळ आणि पैसा कमी पडू देऊ नका, असे आवाहन देखील त्यांनी मुख्यमंत्र्यांना केले.
काही जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या व्यतिरीक्त इतर समाजातील नागरिकांच्या कागदपत्रांवरही कुणबी नोंदी आढळल्या आहेत. त्यांना कायद्यानुसार आरक्षण मिळत असेल, तर आम्हाला त्यात आक्षेप नाही, असेही जरांगेंनी म्हटले. त्यांनाही कायद्यानुसार आरक्षण मिळावे, असेही ते म्हणाले. मात्र, यावरुन त्यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर पुन्हा एकदा निशाणा साधला. असे असेल तर छगन भुजबळ यांच्या अडचणी आणखी वाढणार असल्याचे मत जरांगे पाटील यांनी व्यक्त केले.