पुणे – ताई मला हा ड्रेस आवडला…मावशी मी हा शर्ट घेऊ का…मला मिठाई खूप आवडते, खूप दिवसांनी खाल्ली…थोडासा हळूवार आवाज, पण त्यात प्रेम आणि आदराची भावना असलेल्या इरशाळवाडीतील अनाथ मुला-मुलींनी कपडे, दागिने व मिठाई खरेदीचा आनंद घेतला. हा आनंद विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. निलम गोऱ्हे यांनी दिला. यावेळी मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि आपलेपणा पाहून डॉ. निलम गोऱ्हे, नाना भानगिरे यांच्यासह पदाधिकाऱ्यांचे डोळे पाणवले.
राष्ट्रप्रथम ट्रस्ट, वंदेमातरम संघटना, दशरथ भानगिरे ट्रस्ट, युवा वाद्य पथक ट्रस्ट, तुळशीबाग गणपती मंडळ यांच्या माध्यमातून आणि जय गणेश व्यासपीठ यांच्यातर्फे दिवाळी निमित्त दरडग्रस्त इरशाळवाडीतील मुलामुलींसाठी “पुण्याची दिवाळी सहल आणि आनंद मेळा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ. नीलमताई गोऱ्हे यांनी स्वत: मुलांना दुकानात नेऊन खरेदी केली. यावेळी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोदनाना भानगिरे, वैभव वाघ, अश्विनी शिंदे, विकास पवार, विनायक कदम, नितीन पंडित यासह शिवसैनिक उपस्थित होते. तुळशीबाग व्यापारी असोसिएशन आणि मंडळाने सर्व मुलांचे चांगले आदरातिथ्य केले.
“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार इरशाळवाडी दुर्घटनेच्या ठिकाणी पाहणी करून उपयोजना अंमलबजावणी वेगाने करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या. तेथील मुले पुन्हा शाळेत जायला लागले असून त्यांच्या भविष्यासाठी आवश्यक ती मदत शासनाच्या माध्यमातून केली जात आहे.”
– डॉ. निलम गोऱ्हे, उपसभापती, विधानपरिषद
पुणे पोलिसांचे केले अभिनंदन…
तुळशीबाग येथे अनेक देव देवतांची वास्तव्य आहे. मोठी बाजारपेठ असून, या परिसराचे पोलीस उपायुक्त संदीप गिल आहे, हे भाग्य आहे. गणेशोत्सव काळातही त्यांनी चोख बंदोबस्त ठेवला. दहशतवाद्यांचे गैरकृत्य रोखण्याचे काम पुणे शहर पोलिसांनी केले, याबाबत पुणे शहराचे आयुक्त आणि त्यांच्या टीमचे डॉ. गोऱ्हे यांनी अभिनंदन केले.