- पिंपरी-चिंचवड महापालिकेचे नागरिकांना आवाहन
पिंपरी – शहरामध्ये गेल्या आठ दिवसांपासून पाऊस पडत आहे. पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्यासारखे साथीचे आजार पसरू नयेत, यासाठी नागरिकांनी वेळीच खबरदारी घ्यावी. डासांच्या उत्पत्तीस आळा घालण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी केले आहे.
पिंपरी-चिंचवड शहरात सध्या करोनाचा मोठा प्रादुर्भाव आहे. त्यातच गेल्या काही दिवसांपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे पावसाळ्यात हिवताप, डेंग्यू, चिकनगुन्यासारखे डासांमुळे उद्भवणारे साथीचे आजार पसरण्याची शक्यता आहे. हिवताप हा आजार एनॉफिलस आणि डेंग्यू, चिकनगुणिया हे आजार पसरविण्यास एडिस इजिप्टाय हे डास कारणीभूत असतात. यामध्ये ताप तीव्र डोकेदुखी, अंगावर पुरळ येणे, स्नायू अथवा सांधेदुखी, मळमळणे, उलटी यापैकी लक्षणे आढळून येतात.
हिवताप, डेंग्यू किंवा चिकनगुनिया झालेल्या व्यक्तीला डास चावला तर, रोग्याच्या रक्तातील हिवताप, डेंग्यू आणि चिकनगुणियाचे विषाणू त्या रुग्णांच्या शरीरात शिरतात. असा विषाणूजन्य डास निरोगी माणसाला चावल्यास त्याला संबंधित रोग होण्याची शक्यता वाढते. त्यामुळे या रोगांचा प्रसार थांबविण्यासाठी एनॉफिलस आणि एडिस डासांच्या उत्पत्तीवर आळा घालावा लागणार आहे.
घरात साचलेल्या स्वच्छ पाण्यावर मादी अंडी घालते. त्यामुळे घरात आणि घराजवळच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. त्याचप्रमाणे तापाची कोणतीही लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी त्वरित योग्य वैद्यकीय उपचार घ्यायला हवेत. ताप आल्यास रक्ताचा नमुना तपासून घ्यावा, असे आवाहन डॉ. साळवे यांनी केले आहे.
घरात पाण्याची साठवण केली जाणारी भांडी आणि घराभोवतीच्या परिसरात साचलेले सांडपाणी अशा ठिकाणी डासांची उत्पत्ती होते. त्यासाठी परिसर स्वच्छ ठेवावा. घरातील फ्लॉवर प्लॉट, कुलर, मनीप्लॅंट, शोभेची छोटी कारंजे, फ्रीजचा खालचा ट्रे दर आठवड्यास रिकामे करून साफ करावेत. घराच्या मागील अंगणात किंवा गच्चीवरील भंगार मालाची विल्हेवाट लावावी. घराभोवतीची पाण्याची डबकी बुजवावीत किंवा वाहती करावी, असे आवाहनही डॉ. साळवे यांनी केले आहे.