नवी दिल्ली : कोरोनाचे वाढत जाणारे संकट थोपवण्यासाठी सरकारकडून सर्व प्रयत्न केले जात आहेत. आता कोरोना व्हायरसच्या सर्व टेस्ट मोफत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. सरकारी रुग्णालयांमध्ये कोरोनाची टेस्ट मोफतच केली जाते, मात्र खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी सरकारने खासगी प्रयोगशाळांना 4500 रुपयांपर्यंत पैसे घेण्याची परवानगी दिली होती.
वकील शशांक देव सुधी यांनी याचिक दाखल करत सरकाररच्या अधिसूचनेला आव्हान दिले होते. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखणे सरकारची जबाबदारी आहे. लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लोकांच्या टेस्ट होणे गरजेचे आहे. त्यासाठी सरकारी रुग्णालयाप्रमाणे खासगी प्रयोगशाळांमध्येही कोरोनाचा तपासणी मोफत झाली पाहिजे, असे या याचिकेत म्हटले होते.
सर्वोच्च न्यायालयाने याचिकेतील मागणी योग्य मानत खासगी प्रयोगशाळांना कोरोनाची टेस्ट मोफत करण्याचे आदेश दिले आहेत. कोरोनाचे संकट दिवसेंदिवस वाढत आहे, अशा परिस्थितीत कोरोनाची टेस्ट मोफत झाली पाहिजे, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने दिले. कोरोना टेस्ट मोफत झाल्यास त्यांचा फायदा होईल आणि कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यास मदत होईल. सरकार खाजगी प्रयोगशाळांना नंतर भरपाई देणार का हे अजून स्पष्ट नाही. मात्र पुढील सुनावणीत सरकारकडून या प्रयोगशाळांना भरपाई देण्याबाबत विचार केला जाईल, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटले. मात्र लोकांनी कोरोना टेस्ट मोफत झाली पाहिजे, हे महत्त्वाचे आहे.