चिखली, (वार्ताहर) – पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीतील उपनगरांमध्ये ठिकठिकाणी अनधिकृत भंगार व्यावसायिकांनी बस्तान बसविले आहे. परंतु या दुकानांमुळे शहरात वारंवार आगीच्या घटना घडत आहेत. त्यामुळे आजूबाजूच्या रहिवासी भागातील नागरिकांचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यामुळे बेकायदेशीर भंगार व्यावसायिकांवर कारवाई करण्याची मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनच्या वतीने महापालिका आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे करण्यात आली आहे.
आयुक्त सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहरामध्ये अनेक ठिकाणी बेकायदेशीर अनधिकृत भंगाराची दुकान आहेत. विशेषतः कुदळवाडी या भागामध्ये पाच ते सहा हजार अशी कोणतीही परवानगी नसणारी बेकायदेशीर अनधिकृत भंगाराची दुकाने आहेत. या भंगारांच्या दुकानांमध्ये रात्री प्लॅस्टिक जाळले जाते, लोखंड वितळविले जाते, इतर केमिकल युक्त पदार्थ रात्रभर जाळले जातात यामुळे खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते.
तसेच या भागात सतत या सर्व गोष्टींमुळे आगी लागतात आणि त्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात प्रदूषण होते. आणि याच भागामध्ये दोन मोठे मोठे पेट्रोल पंप आहेत. दुर्दैवाने एखाद्यावेळी आगीच्या घटनेमध्ये हे पेट्रोल पंप देखील बेचिराक होतील आणि अर्धे अधिक शहर या आगीमुळे भस्मसात होईल. त्यामुळे कृपया या गोष्टीचे गांभीर्य ओळखून.
ही सर्व स्क्रॅपची अनधिकृत दुकाने ताबडतोब काढून टाकावीत आणि या कोणतीही परवानगी नसणार्या अनधिकृत स्क्रॅपच्या दुकानाला आपल्या महापालिकेकडून पुरविले जाणारे पाणी, लाईट देखील त्वरित बंद करण्यात यावी. पुढील दोन-तीन महिन्यांत यावर कारवाई झाली नाही तर आमच्या फेडरेशन मार्फत याबाबत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
कुदळवाडी भागामध्ये पाच ते सहा हजार अनधिकृत भंगार व्यावसायिकांची दुकाने आहेत. ही दुकाने रहिवासी जागेत उभे आहेत. विशेषतः या अनधिकृत स्क्रॅपच्या दुकानांना महापालिकेकडून पाणी आणि लाईट पुरवली जाते. प्रमाणिकपणे कर भरणार्या आमच्या सोसायटीधारकांना पाण्यासाठी वणवण करावी लागते परंतु या कुदळवाडी भागातील पाच ते सहा हजार स्क्रॅपच्या दुकानांना मुबलक प्रमाणात पाणी दिले जाते.
महापालिकेच्या आयुक्त साहेबांनी याकडे लक्ष देऊन कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता ही सर्व दुकान त्वरित हटवून आमच्या नागरिकांचे प्रदूषणापासून होणारे नुकसान थांबवावे.- संजीवन सांगळे, अध्यक्ष चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन.