पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या माध्यमातून आठ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत येणा-या उपनगरांमध्ये पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेत तब्बल २ लाख ४ हजार १५४ बालकांना पल्स पोलिओ प्रतिबंधक लस पाजण्यात आली. आजअखेर शहरात पोलिओचा एकही रुग्ण आढळून आला नसल्याची माहिती वैद्यकीय विभागाकडून देण्यात आली.
केंद्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार रविवारी (दि. ३) राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले. १९९५ पासून आयोजीत होणाऱ्या राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेचे हे २८ वे वर्ष आहे. मोहिमेचे उद्घाटन महापालिकेचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांच्या हस्ते थेरगाव रुग्णालयामध्ये करण्यात आले. यावेळी सहाय्यक संचालक व राज्याचे पल्स पोलिओ नोडल अधिकारी डॉ. अनिरुद्ध देशपांडे, अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अभयचंद्र दादेवार आदी उपस्थित होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने शहरातील ५ वर्षाखालील सर्व मुलांना पोलिओ प्रतिबंधक लसीकरण करण्यासाठी शहरामध्ये एकूण ११०९ लसीकरण केंद्रांची स्थापना केली. त्यापैकी सर्व पालिकेचे दवाखाने, मोठी खाजगी रुग्णालये, झोपडपट्टीतील अंगणवाडी, अशा ९६४ ठिकाणी स्थायी लसीकरण केंद्रे, बस स्थानक, रेल्वे स्टेशन, मेट्रो स्टेशन अशा ठिकाणी ५८ ट्रान्झीट लसीकरण केंद्रे, वीटभट्ट्या, बांधकामे, फिरत्या लोकांची पाले या ठिकाणच्या मुलांसाठी ८१ फिरत्या लसीकरण केंद्रांची सोय केली आहे.
रविवार (दि. ३) पासून शहरात ५ वर्षाखालील बालकांचे पल्स पोलिओ लसीकरण करण्यात येत आहे. याची खात्री करण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन तपासणी करण्यात येणार आहे. पल्स पोलिओ लसीकरणासाठी वापरण्यात येणारी लस जागतिक आरोग्य संघटनेने प्रमाणित केलेली आहे.
लसीकरण करणारे कर्मचारी प्रशिक्षित आहेत. आपल्या घरातील व परिसरातील ज्या बालकांचे रविवारी लसीकरण झाले नसेल, त्यांना घरी येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडून लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन वैद्यकीय विभागाकडून करण्यात आले आहे.
स्वयंसेवकांचे लसीकरणास योगदान
शहरात ११०९ लसीकरण केंद्रांमार्फत ८ विभागीय प्रभारी वैद्यकीय अधिकारी व ७५ वैद्यकीय अधिकारी यांचे नेतृत्वाखाली २५५ पर्यंवेक्षक व ३२०३ लसीकरण लसीकरण कर्मचारी नेमण्यात आले होते.
ही मोहीम यशस्वी करण्यासाठी पालिका क्षेत्रातील विविध नर्सिंग, फिजिओथेरपी, फार्मसी, मॅनेजमेंट व ईतर शाखेमधील महाविद्यालयीन विद्यार्थी, एमपीडब्लू, एएनएम, बालवाडी शिक्षिका, महिला आरोग्य समितीचे सदस्य, अंगणवाडी सेविका, अंगणवाडी मदतनीस, आशा, रोटरी क्लबचे स्वयंसेवक, टाटा मोटर्स मधील स्वयंसेवक व इतर विविध सेवाभावी संस्थांच्या स्वयंसेवकांचे सहकार्य घेण्यात आले.