पिंपरी, (प्रतिनिधी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कर संकलन व कर आकारणी विभागाने 2023-24 या आर्थिक वर्षात 977 कोटी 50 लाख रुपयांचा कर वसूल केला आहे. महापालिकेच्या 41 वर्षांच्या इतिहासात प्रथमच 1 हजार कोटींच्या जवळपास टप्पा गाठला आहे. 6 लाख 25 हजार मालमत्ता धारकांपैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा केला आहे. करदात्यांचे महापालिका आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांनी आभार मानले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या उत्पन्नाचा मालमत्ता कर प्रमुख स्त्रोत आहे. महापालिका हद्दीत 6 लाख 25 हजार मालमत्ता आहेत. यापैकी 5 लाख 11 हजार 154 मालमत्ता धारकांनी आपल्या कराचा भरणा केला आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाने गतवर्षी 816 कोटींचा कर वसूल केला होता. यंदा 161 कोटींचा अधिक कर वसूल करण्यात महापालिकेला यश आले आहे, अशी माहिती करसंकलन विभागाचे सहाय्यक संचालक नीलेश देशमुख यांनी दिली.
गेल्या वर्षभरापासून थकबाकीदारांच्या मालमत्ता जप्त करणे, नळ कनेक्शन खंडित करणे, बड्या थकबाकीदारांची नावे वर्तमान पत्रात नावे प्रसिद्ध करणे, मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया, मीम्स, रिल्स सारखी अनोखी स्पर्धा, शहरात वर्दळीचे ठिकाण, मुख्य चौक, रस्ते इ. ठिकाणी होर्डींग्ज व फ्लेक्सद्वारे जाहिरात प्रसिद्धी, पॅम्पलेट वाटप, सोशल मीडियाद्वारे चित्रफीत, लाऊडस्पीकरवर थकबाकीदारांच्या नावांची घोषणा करणे, जिंगलद्वारे जाहिरात प्रसिद्धी, कर संवाद अशा माध्यमातून करदात्या थकबाकीदारांमध्ये वेळोवेळी जनजागृती करण्यात केली.
मालमत्ता कर वसुलीसाठी नागरीकांना मालमत्ता कराची बिल ऑनलाइन तसेच कर भरण्यासाठी ऑनलाइन व ऑफलाइन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. मालमत्ताधारकांचे विविध घटकांसाठी ऑनलाइन व ऑफलाइन कर सवलत योजना, थकित कर वसुलीसाठी वेळोवेळी घरभेटी देणे, पत्र देणे, जप्तीपूर्व नोटीसा देण्याची कार्यवाही करण्यात आली.
ठळक बाबी
– महापालिकेच्या इतिहासात पहिल्यांदाच 977 कोटींची मजल
– दोन हजारांपेक्षा जास्त मालमत्ता सील.
– विभागाच्या संपूर्ण सेवा ऑनलाइन.
-पहिल्यांदाच 87 टक्के चालू कर वसूल करण्यात यश
– 49.36 टक्के थकीत कर वसूल करण्यात यश
– सहा वर्षांत दुप्पट उत्पन्न
असा जमा झाला कर
ऑनलाईन – 554 कोटी 59 लाख
रोख – 137 कोटी 49 लाख
धनादेशाद्वारे – 166 कोटी 57 लाख
ईडीसी – 13 कोटी 81 लाख
आरटीजीएस -44 कोटी 76 लाख
डीडी – 8 कोटी 57 लाख
विविध अॅप- 10 कोटी 2 लाख
इनइफ्टी – 6 कोटी 93 लाख
कर भरणार्या मालमत्तांची आकडेवारी
औद्योगिक – 4 हजार 609
निवासी- 4 लाख 42, 285
बिगरनिवासी – 46 हजार 576
मिश्र- 12 हजार 968
मोकळ्या जमिन 4 हजार 574
इतर – 142
एकूण – 5 लाख 11 हजार 154
वाकड झोनमधून 154 कोटींचा उच्चांकी कर वसूल
शहरात कर संकलनासाठी महापालिकेचे 17 झोन आहेत. यामध्ये वाकड झोनमध्ये सर्वाधिक म्हणजे 68 हजार मालमत्ता धारकांनी 154 कोटी 58 लाख रुपयांचा कर जमा केला आहे. त्याखालोखाल सांगवीत 51 हजार 718, चिखलीत 45 हजार 634, थेरगावमध्ये 45 हजार 434, चिंचवडमध्ये 43 हजार 286, मोशीत 34 हजार 980, भोसरीत 33 हजार 867 मालमत्ता धारकांनी कराचा भरणा झाला आहे. तर सर्वात कमी तळवडे झोनमध्ये फक्त 8 हजार 527 मालमत्ता धारकांनी कर भरणा केला आहे.
कर वसुलीचा वाढता आलेख
वर्ष वसूल झालेला कर
2018-19 : 471 कोटी
2019-20 : 480 कोटी
2020-21 : 553 कोटी
2021-22 : 628 कोटी
2022-23 : 816 कोटी
2023-24 : 977 कोटी
यंदा आम्ही एक हजार कोटींच्या लक्ष्याच्या अगदी जवळ पोहचलो याचे समाधान आहे. मालमत्ताधारकांना मी यानिमित्त धन्यवाद देऊ इच्छितो. सन 2024-25 या वर्षात सर्वेक्षणातील सर्व नवीन मालमत्तांची कर आकारणी करणे, करविषयक सर्व अभिलेखांचे स्कॅनिंग, डीजिटायझेशन करून हा विभाग संपूर्णतः लोकाभिमुख होईल याचा प्रयत्न राहील. तसेच सर्व मालमत्तांच्या युपिक आयडी द्वारे महापालिकेच्या सर्व सेवा एकत्रित करण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे.
:- शेखर सिंह आयुक्त, पिंपरी चिंचवड महानगरपालिका