पुणे – लग्न समारंभ, शैक्षणिक सहली, सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल पुण्यात सुरू आहे. त्यामध्ये पुण्यासह बाहेरगावाहून पुणे पर्यटनाला येणार्यांसाठी पीएमपीकडून अलिशान ई-बस आणि सीएनजी बस भाडेतत्वावर देण्यात येत आहे. विशेषत: शनिवार आणि रविवार सुट्टीच्या दिवशी खास पुणेकरांसाठी सलवतीच्या दरामध्ये बस उपलब्ध होणार आहे. त्यामुळे या सेवेचा नागरिकांनी, शैक्षणिक संस्थांनी लाभ घ्यावा, असे आवाहन पीएमपी प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
पीएमपीच्या ताफ्यात आता नवीन सीएनजी आणि लक्झरीज ई-बस दाखल झाल्या आहेत. या बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसादही मिळत असून, पुणेकरांना माफत दरामध्ये लग्न समारंभासह अन्य कार्यक्रम किंवा आयटी कंपनी, हॉस्पिटल, खासगी कंपन्यातील कर्मचाऱ्यांना ने-आण करण्यासाठी तसेच शहर परिसरात सहलीसाठी बस उपलब्ध करण्यात येत आहे. “कमी खर्चात सुखद प्रवास’ असून, या उपक्रमाला प्रतिसादही मिळत आहे.
शहराच्या गर्दीत पीएमपी सोइची
सध्या पुणे शहरासह विविध जिल्ह्यातून शैक्षणिक सहली पुणे पर्यटनासाठी येत आहे. त्यावेळी शहरातील कोंडी लक्षात घेता आणि एतिहासिक व पर्यटनस्थळांना वेळेत भेट देणे शक्य होण्यासाठी पीएमपी सेवा नक्कीच उपयोगी ठरेल. त्यासाठी भाडेतत्वावरील बस बुकींग करता येऊ शकते. विशेषत: पुण्यातील शाळांना ही सेवा सोयीची ठरणार आहे. दरम्यान पर्यटकांना सुट्टीच्या दिवशी पीएमपीकडून खास २५ टक्के सवलत देण्यात आली आहे.
“पीएमपीकडून प्रवाशांच्या सुविधेसाठी हा नव्याने करार करण्यात आला असून, त्यामुळे सवलतीच्या दरामध्ये भाडेतत्वावर बससेवा उपलब्ध होणार आहे. विशेषत: शहरातील पर्यटनस्थळ पाहण्यासाठी या सेवेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा.” – नितीन नार्वेकर, सहव्यवस्थापकीय संचालक, पीएमपीएमएल