सातारा : सध्या माहिती व तंत्रज्ञानातील क्रांतीमुळे उपलब्ध झालेल्या साधनांमुळे सर्वांमधील वाचनाची सवय लुप्त होवू पहात आहे. नव्या पिढीला वाचनाचे महत्व कळावे व वाचनातून ज्ञान मिळवून चांगली पिढी तयार व्हावी यासाठी ‘एक तास वाचण्यासाठी’ उपक्रम सर्व शाळांमध्ये राबवण्यात येत असून शनिवारी येथील रयत शिक्षण संस्थेच्या महाराजा सयाजीराव विद्यालयात या उपक्रमाचा शुभारंभ झाला.
यावेळी सकाळच्या सत्रात मुलांनी या उपक्रमात सहभाग घेवून एक तास त्यांना मिळालेल्या विविध पुस्तकांचे वाचन केले. प्राचार्य गुजले यांनी वाचनाचे जीवनामधील स्थान किती उच्च याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. पाचवी ते नववीमधील विद्यार्थ्यांनी या उपक्रमात सहभागानंतर मी वाचलेले पुस्तक या विषयावर मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी विद्यालयाचे उप-मुख्याध्यापक खाड, पर्यवेक्षक शिंदे, जाधव, ग्रंथपाल शिंदे तसेच सर्व शिक्षक, शिक्षकेतर व विद्यार्थी उपस्थित होते. ए. एल. कुंभार यांनी आभार मानले.