जनहितासाठी आचारसंहितेचा फेरआढावा घ्या – गेहलोत

जयपूर – निवडणूक काळात लागू होणाऱ्या आचारसंहितेचा जनहितासाठी फेरआढावा घेतला जावा, अशी मागणी राजस्थानचे मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी केली आहे. त्यासंबंधीचे पत्र त्यांनी निवडणूक आयोगाला पाठवले आहे.

गेहलोत यांनी मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांना पाठवलेल्या पत्रात आचारसंहितेचा कालावधी कमी करण्याच्या गरजेवर भर दिला आहे.

त्यांनी पत्रात म्हटले आहे की, आचारसंहितेच्या काळात छोट्या स्वरूपाचे विकासकाम करण्यालाही मनाई असते. त्यामुळे कुठल्याही लोकनियुक्‍त सरकारला कार्य करणे अवघड बनते. आचारसंहितेचा प्रदीर्घ कालावधी सरकारांना घटनात्मक कर्तव्ये पार पाडण्यातील अडथळा ठरतो. त्यातून धोरणात्मक पांगळेपणा निर्माण होतो. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीमुळे देशात 78 दिवसांसाठी आचारसंहिता अस्तित्वात होती. त्यामुळे सरकारी कार्य ठप्प झाल्याने जनतेला समस्यांचा सामना करावा लागला. आचारसंहिता लागू असताना समाजकल्याणाशी निगडीत कामांचा आढावा घेता येत नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.