जयपूर – कॉंग्रेसने पंख छाटल्यानंतर राजस्थानमधील तरूण नेते सचिन पालयट कुठले पाऊल उचलणार याविषयीची उत्सुकता ताणली गेली आहे. ते उद्या (बुधवार) पत्रकार परिषद घेणार असल्याची चर्चा आहे.
पायलट यांनी बंडाचा पवित्रा स्वीकारल्याने राजस्थान कॉंग्रेसमधील सत्तासंघर्ष चव्हाट्यावर आला. त्यातून पायलट यांना उपमुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्ष पदांवरून हटवण्यात आले. त्यानंतर सत्य पराजित होऊ शकत नाही, अशा आशयाची एका ओळीची प्रतिक्रिया पायलट यांनी ट्विटरवरून दिली. तीन दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय नाट्याबाबत पायलट यांच्या गोटातून अद्याप मौनच बाळगण्यात आले आहे.
राजस्थान सरकार पाडण्यासाठी भाजपकडून रचण्यात आलेल्या राजकीय कारस्थानाचा भाग पायलट बनल्याचा आरोप कॉंग्रेसकडून केला जात आहे. मात्र, पायलट आणि भाजप एकमेकांच्या संपर्कात आहेत का, याबाबत कुठलीच माहिती पुढे येऊ शकलेली नाही. त्यामुळे राजकीय सस्पेन्स आणखी वाढला आहे.
राजस्थान विधानसभेचे एकूण संख्याबळ 200 आहे. त्यामध्ये पायलट आणि त्यांच्या समर्थकांसह कॉंग्रेसचे 107 आमदार आहेत. कॉंग्रेस सरकारला अपक्ष आणि लहान पक्षांच्या 18 आमदारांनी पाठिंबा दिला आहे. पायलट यांच्या पाठिशी कॉंग्रेसमधील 18 आमदार असल्याचे सांगितले जात आहे. तूर्त मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना बहुमताचे पाठबळ असल्याचे चित्र आहे. तसे असले तरी यापुढे घडणाऱ्या राजकीय घडामोडींवर गेहलोत सरकारचे अस्तित्व अवलंबून असल्याचे सूचित होत आहे.